मराठी भाषेचा गौरव ३६५ दिवस व्हायला हवा- मंत्री उदय सामंत

मुंबई / रमेश औताडे : मराठी ही आपली मातृ भाषा आहे तिचा गौरव केवळ २७ फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रज यांच्या जयंती दिनीच होतो. तो ३६५ दिवस व्हायला हवा. असे प्रतिपादन उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल मुंबई मराठी पत्रकार संघात केले.
शिवसेना दक्षिण मुंबईच्यावतीने विभागप्रमुख दिलीप नाईक यांनी शुक्रवारी मराठी भाषा गौरव दिनाचा सोहळा मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित केला होता.
त्यानिमित्ताने मुंबई महानगरपालिकेत वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांचा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पक्ष प्रवक्ते किरण पावसकर, उपनेते एकनाथ शेलार, सुनील नरसाळे, प्रमोद मांद्रेकर, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, पालिका वार्ताहर संघाचे अध्यक्ष मारुती मोरे तसेच शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी ४0 लाख झोपडी वासियांना मोफत घरे देण्याची घोषणा १९९५ साली केली होती. झोपडी वासियांना घरे देणारी हीच ती एस आर ए योजना आहे. पण या झोपड्या वाढत गेल्या त्याला कारण आपलेच मराठी बांधव आहे असे सांगत, ते म्हणाले,
रेशन ऑफिस ,पोलिस आणि पालिका येथे काम करणारा मराठी माणूस अमराठी माणसांना सहकार्य करीत होता म्हणून मुंबईत झोपड्या वाढल्या. त्यामुळे आपल्या पासून मराठी भाषेचे संवर्धन केले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या व्यक्तीचा राज्य सरकारने पुरस्कार देऊन गौरव करावा अशीही सामंत यांनी सूचना केली. प्रत्येकाने आपल्या मातृभाषेत मराठीत बोलले पाहिजे मग तुम्ही परदेशात असा किंवा मायदेशात असा यासाठी पत्रकारांनी जनजागृती केली पाहिजे असेही मंत्री उदय सामंत म्हणाले.