मुंबई कॅांग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांचे कोरोना ने निधन
मुंबई,दि.२८: माजी खासदार व मुंबई कॅांग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांचे आज सकाळी १०.०० वाजता कोरोना मुळे दु:खद निधन झाले.ते ८१ वर्षांचे होते. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे ते वडील होत.
एकनाथ गायकवाड यांचा जन्म १ जाने १९४० रोजी सातारा येथे झाला. आमदार म्हणून ते मुंबईतील धारावी मतदार संघातून १९८५-९०, १९९०-९५ व १९९९-२००४ असे ३ वेळा निवडून आले होते. १९९३-९५ व १९९९-२००४ या कालावधीत ते राज्यमंत्री म्हणून कार्यरत होते. आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, सामाजिक न्याय, कामगार, उच्च व तंत्र शिक्षण अशी विविध खाती त्यांनी भुषविली होती.
२००४ च्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांना त्यांनी पराभूत केले होते.त्यानंतर २००९ साली सलग दुसऱ्यांदा ते खासदार म्हणून निवडून आले होते.
२०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून शिवसेनेच्या राहुल शेवाळेंनी त्यांचा पराभव केला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसचे मुंबईचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आपापल्या पदाचे राजीनामे दिले होते. त्यामुळे काँग्रेस हायकमांडने मुंबई काँग्रेस च्या अध्यक्ष पदी एकनाथ गायकवाड यांची नियुक्ती केली होती. स्वभावाने अत्यंत विनयशील व हसतमुख असलेल्या एकनाथ गायकवाड यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
काँग्रेस पक्षाचा एक प्रमुख चेहरा हरपला!
ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाचा एक प्रमुख चेहरा काळाच्या पडद्याआड गेल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
गायकवाड यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना चव्हाण म्हणाले की, आयुष्यभर त्यांनी काँग्रेसचा सर्वसमावेशक विचार तेवत ठेवला. राजकारणात अनेक चढ-उतार सोसले. पण कधीही आपल्या तत्वांचा त्याग केला नाही. युवक काँग्रेसपासून सुरू झालेली त्यांची राजकीय कारकीर्द आमदार, मंत्री, खासदार, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष अशी बहरत गेली. अनेक मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. पण आपली साधी राहणी व कार्यकर्त्यांशी संपर्क त्यांनी कधी सोडला नाही. ते खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेचे व कार्यकर्त्यांच्या मदतीला धावून जाणारे नेते होते. त्यामुळेच प्रदीर्घ काळ आमदार व खासदार म्हणून प्रतिनिधीत्व करण्याची जबाबदारी जनतेने मोठ्या विश्वासाने त्यांच्यावर सोपवली होती.
एकनाथ गायकवाड यांच्यावर काळाने कोरोनाच्या रूपात घातलेला घाला काँग्रेस पक्ष आणि समाजासाठी मोठी हानी आहे. त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो व आमच्या सहकारी प्रा. वर्षाताई गायकवाड तसेच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला हे अपरिमित दुःख सहन करण्याचे सामर्थ्य मिळो, अशी प्रार्थना करतो.
एकनाथराव गायकवाड साहेबांच्या निधनानं *महाविकास आघाडीचे मार्गदर्शक नेतृत्व हरपले..
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गायकवाड यांना श्रद्धांजली वाहताना म्हटले आहे, की माजी खासदार सन्माननीय एकनाथराव गायकवाड साहेबांच्या निधनानं समाजातील वंचित, उपेक्षित बांधवांच्या हक्कांसाठी लढणारा हक्काचा माणूस आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. एकनाथराव गायकवाड साहेबांचे नेतृत्व समाजातील सर्व थरांपर्यंत पोहोचलेलं, सर्वमान्य नेतृत्व होतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर प्रगाढ निष्ठा आणि काँग्रेसच्या विचारधारेशी ते जीवनभर प्रामाणिक राहिले. त्यांचं निधन ही समाजातील पुरोगामी, सुधारणावादी चळवळीची मोठी हानी आहे. त्यांच्या निधनामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ज्येष्ठ मार्गदर्शक गमावला आहे. आम्ही सर्वजण गायकवाड साहेबांच्या कुटुंबियांच्या आणि कार्यकर्त्यांच्या दुःखात सहभागी आहोत.