राज्यातील महाविकास आघाडी बद्दल शरद पवार यांनी केले ‘हे’ मोठे विधान
शिवसेनेला विश्वास असणारा पक्ष म्हणून प्रशस्तीपत्र

मुंबई l आघाडी सरकार किती दिवस टिकेल याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. पण हे सरकार पाच वर्ष टिकेलच, पण त्यापुढे लोकसभा आणि विधानसभेलाही चांगली कामगिरी करेल, असा दवा करत शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष आहे, असे प्रशस्तीपत्रक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसचा 22 वा वर्धापन दिन गुरुवारी (ता.१०) पक्षाच्या बेलर्ड पिअर येथील कार्यालयात पार पडला. त्यानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, सुनिल तटकरे आदी उपस्थित होते.
हे सरकार टीकेल आणि पाच वर्ष काम करेल. नुसतेच काम करणार नाही तर लोकसभा आणि विधानसभेत एकत्रित काम करुन सामान्य जनतेचे देशात आणि राज्यात प्रतिनिधित्व करण्याचे काम करेल याबाबत शंका नाही,” असे मोठे विधान पवार यांनी केले.
आपण राज्याला वेगळ्या विचारांचे सरकार दिले. शिवसेना आणि आपण एकत्र काम करु शकतो असे कोणला पटले नसते. पण लोकांना पर्याय दिला आणि त्यांनी तो स्वीकारला. तिन्ही पक्षांनी योग्य पावले टाकली आणि आज आघाडी सरकार चांगल्या रितीने काम करत आहे, असे कौतुक त्यांनी केले.
प्रधानमंत्री मुख्यमंत्र्यांसोबत स्वतंत्र बसले आणि चर्चा केली असे सांगत लगेच वेगवेगळ्या वावड्या उठवण्यात आल्या. शिवसेनेसोबत आपण कधी काम केले नाही, पण महाराष्ट्र शिवसेनेलासुद्धा कित्येक वर्षांपासून पाहतो आहे. माझा यासंबंधीचा अनुभव विश्वास असणारा आहे, असे पवार म्हणाले.
जनता पक्षाचे राज्य आले त्यानंतरच्या कालखंडात काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी शिवसेनाच पुढे आली. सेना नुसती पुढे आली नाही तर इंदिरा गांधींना मदत करण्यासाठी शिवसेनेने एकही उमेदवार विधानसभा निवडणुकीत उभा केला नाही, अशी आठवण त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची कथन केली.
पक्षाचा नेता असा निर्णय घेतो तुम्ही विचार करा. पण त्याची चिंता कधी बाळासाहेबांनी केली नाही. त्यांनी इंदिरा गांधींना दिलेला शब्द निवडणूक न लढवत पाळला. शिवेसनेने ज्या पद्धतीने त्या कालखंडात भक्कमपणाची भूमिका घेतली तीच भूमिका सोडण्यासंबंधी कोणी सांगत असेल तर तसे होणार नाही, असा आशावाद पवारांनी व्यक्त केला.
देशात अनेकांनी अनेक पक्ष काढले. १९७७ मध्ये जनता पार्टीचा प्रयोग झाला पण दोन वर्षात तो प्रयोग संपला. असे अनेक पक्ष आले, पण राष्ट्रवादीनं २२ वर्ष पूर्ण केली. जनतेच्या बांधिलकीमुळे आपण इथपर्यंत पोहोचलो, या शब्दात त्यांनी ऋण मानले.
काही लोक पक्ष सोडून गेले पण त्यामुळे नवीन नेतृत्व तयार झाले. मंत्रीमंळातील अनेक जण नवी जबाबादारी पार पडण्यात यशस्वी होत आहेत, असे सांगत अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कोरोना काळातील कामास शाबासकी दिली.
लोकांचे प्रश्न सोडण्यासाठी सत्ता महत्वाची आहे. पण त्यामुळे नेतृत्वाची फळी निर्माण होते हे माझ्यासाठी जास्त महत्वाचे आहे. याचे १०० टक्के श्रेय पाठीशी उभ्या राहणाऱ्या सामान्यांचे असून त्यांची बांधीलकी कायम ठेवली पाहिजे,” असेही पवार यांनी बजावले.
मराठा आरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्थांतील इतर मागासवर्गीयांचे राजकीय आरक्षण हे प्रश्न आपल्याला सोडवावे लागतील. सत्ता एकाच ठिकाणी राहिली की भ्रष्ट होते. सत्ता भ्रष्ट व्हायची नसेल तर अधिकांच्या हाती गेली पाहिजे. समाजातील प्रत्येत घटकाला आपण सत्तेचे वाटेकरी आहोत असे वाटले पाहिजे, असा सल्ला पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना शरद पवार यांनी दिला.