रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण 358 जातीवाचक वस्त्यांची व 23 जातीवाचक रस्त्यांची नावे बदलण्याचा निर्णय…

रत्नागिरी: ग्रामीण भागातील वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याबाबत राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला असून, त्यानुसार रत्नागिरी जिल्हयातील ग्रामीण भागातील एकूण ३५८ जातीवाचक वस्त्यांची व २३ जातीवाचक रस्त्यांची नावे बदलण्यात आली आहेत. महाराष्ट्रातला एवढा मोठा निर्णय होणारा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा रत्नागिरी जिल्हा आहे, अशी माहिती राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी येथे दिली.
राज्यातील शहरातील व ग्रामीण भागातील अनेक गावांची वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून अशा जातीवाचक नावाऐवजी महापुरूषांची व लोकशाही मूल्यांशी निगडीत नावे देणेकरिता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. राज्यातील ग्रामीण भागातील केवळ वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याबाबतची कार्यपध्दती निश्चित करण्यात आलेले आहेत.
त्यानुसार रत्नागिरी जिल्हयातील ग्रामीण भागातील एकूण ३५८ जातीवाचक वस्त्यांची व २३ जातीवाचक रस्त्यांची नावे बदलणेकरिता ग्रामसभेचा ठराव पास करून त्याबाबतचे प्रस्ताव गटविकास अधिकारी यांचेमार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे प्राप्त झाले होते. सदर प्रस्ताव उचित कार्यवाहीस्तव वरीष्ठ कार्यालयास जिल्हा परिषदेमार्फत पाठविण्यात आले होते. शासन निर्णयान्वये जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याबाबतचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करणेत आलेले आहेत.
त्यानुषंगाने रत्नागिरी जिल्हयातील एकूण ३५८ वस्त्यांची व २३ रस्त्यांची जुनी जातीवाचक नावे बदलून ग्रामसभा ठरावात प्रस्तावित केलेली नवीन नावे शासन निर्णयातील प्राप्त अधिकारांचा वापर करुन जिल्हाधिकारी, रत्नागिरी हे ग्रामीण भागातील वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन प्रस्तावित नावे देण्यासाठी मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
हा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आणि त्याचा शासन परिपत्रक आज माझ्या हातामध्ये आहे. याच्यामध्ये एक मंडणगड तालुका आहे त्याच्यामध्ये लाटवण नावाचं गाव आहे तिथे आदिवासी वाडी असं नाव होतं तर त्या वाढीचे नाव आता एकलव्य वाडी असं झालेला आहे. त्यामुळे समाजावर आधारित वाडी किंवा जातीवाचक वाड्या ज्या आहेत त्यांची नावे बदलण्याची ही संकल्पना आपण मागच्या टर्ममध्ये पालकमंत्री असताना आणलेली होती. ती आज प्रत्यक्षात आली असल्याचे ना. सामंत म्हणाले. महाराष्ट्रातला एवढा मोठा निर्णय होणारा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा रत्नागिरी जिल्हा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.





