मुंबईमधील नव्या इमारतीत फायर, स्मोक अलार्म अनिवार्य, अग्निशमक दलाचा निर्णय

मुंबई:- मुंबईत आग लागण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यामध्ये निष्पाप नागरिकांचे नाहक प्राण जात आहे. काही दिवसांपूर्वी करीरोड येथील अविग्न पार्क या ६५ मजली इमारतीत एकोणिसाव्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडल्यानंतर दोन दिवसांपूर्वी ताडदेव परिसरात देखील अशीच आग लागल्याची घटना घडली. ताडदेवमध्ये लागलेल्या आगीमध्ये सात जणांना आपला प्राण गमवावा लागला.
हे सर्व पाहता अग्निशामक दलाने काही निर्णय घेतले आहेत. यामुळे नाहक होणारी जीवित आणि वित्त हानी टाळण्यासाठी मदत होऊ शकते. या नवीन निर्णयानुसार नव्याने उभ्या राहणाऱ्या इमारतींमध्ये फायर स्मोक, अलार्म अनिवार्य करण्यात आला आहे.हा निर्णय मुंबई अग्निशमक दलाने घेतला आहे.
याच सोबत खाजगी आस्थापने, दुकाने,हॉटेल्स, मोठमोठ्या इमारती यांनी फायर ऑडिट करणे बंधनकारक असून दर सहा महिन्यांनी याचा अहवाल अग्निशमक दलाला देणे महत्वाचे आहे. सध्या मुंबईमधील अग्निशामक यंत्रणा अजून बळकट करण्यासाठी देखील अग्निशमक दल प्रयत्न करणार आहे.दरम्यान कोणतीही घटना घडू नये आणि त्यातून जीवित आणि वित्त हानी होऊ नये यासाठी देखील अग्निशमक दल प्रयत्न करणार असल्याचेही समजते आहे.