बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचं निधन…
मुंबई, दि.४: बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचं आज निधन झालं. त्या ८८ वर्षांचं होत्या. फिल्मफेअरचे संपादक जितेश पिल्लई यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही दु:खद बातमी शेअर केली आहे. आज ४ एप्रिल २०२१ रोजी दुपारी १२ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
७० व्या दशकात त्यांनी मुख्य अभिनेत्री आणि खलनायिका अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका त्यांनी साकारल्या होत्या.त्यांनी तब्बल १०० चित्रपटांमध्ये काम केलं. शशिकला यांचं पूर्ण नाव शशिकला जावळकर असं होतं. त्यांचा जन्म ४ ऑगस्ट १९३२ रोजी सोलापुरात झाला होता. शशिकला यांच्या जिवनात अनेक चढ-उतार आले. असं असलं तरी त्यांचं बालपण मात्र सुखवस्तू घरात गेलं होतं. त्यांचे वडिल मोठे उद्योगपती होते. शशिकला यांना एकूण सहा भावंडं होती.
वयाच्या पाचव्या वर्षापासूनच ही देखणी अभिनेत्री नृत्य, गायन व अभिनय करू लागली. वडिलांचे दिवाळं निघाल्यामुळं हे कुटुंब सोलापूर सोडून उदरनिर्वाहासाठी मुंबईस आलं. त्यावेळेस शशी ७ ते ८ वर्षांची होत्या. तिथं त्यांची नूरजहाँसोबत गाठ पडली व तिला नूरजहाँ यांनी पारखले. त्यानंतर त्यांना‘झीनत’ या शौकत रिझवी (नूरजहाँचे पती) यांच्या चित्रपटात काम मिळालं. त्याच्या ‘जुगनू’ व अजून ३-४ चित्रपटात ४०० रुपये महिन्याने कामे केली, नंतर त्यांच्याकडे तत्कालीन निर्माते, पी. एन. अरोरा, अमिया चक्रवर्ती व व्ही. शांताराम यांचं लक्ष गेलं. १९५३ साली व्ही. शांताराम यांनी त्यांना‘तीन बत्ती चार रास्ता’ या चित्रपटात काम दिलं. वयाच्या विसाव्या वर्षी के. एल. सहगल कुटुंबातील ओमप्रकाश सहगल बरोबर त्यांचा विवाह झाला. त्यांना २ मुली झाल्या.शशिकला यांनी जागा भाड्याने देणे आहे, पठ्ठे बाबुराव, चाळीतील शेजारी, येरे माझ्या मागल्या, झालं गेलं विसरून जा, यंदा कर्तव्य आहे, सलामी, महानंदा, लेक चालली सासरला, धाकटी सून या मराठी चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत