शिवसेना आमदार महेश शिंदे यांचा पक्षाला घरचा आहेर,विधीमंडळाबाहेर केले आंदोलन

मुंबई – सध्या वीज तोडणीच्या मुद्दयावरून सत्ताधारी महाविकास आघाडीला अडचणीत आणण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली असून याच मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक उडालेली पाहायला मिळत आहे. अशातच शिवसेना आमदाराने अर्थात सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने थेट सरकार विरोधात आंदोलन छेडल्यामुळे विधानभवनात हा चर्चेचा विषय बनला आहे.
शिवसेनेचे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्याचे आमदार महेश शिंदे यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर देत विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन सुरू केलं आहे. त्यामुळे महेश शिंदे यांच्या आंदोलनाची चर्चा अधिवेशन परिसरात जोरदार सुरू झाली आहे. सामान्य ग्राहकांच्या वीज बिलाची लूट थांबवा, शेतकऱ्यांच्या वीज तोडण्या थांबवा, महावितरणच्या गलथान कारभाराचा जाहीर निषेध अशा पाट्या घेऊन त्यांनी मूक आंदोलन सुरू केलं आहे.
एकीकडे राज्यात शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचं महाविकास आघाडी सरकार आहे. अशात एका शिवसेनेच्याच आमदाराने पुकारलेलं हे आंदोलन लक्षवेधी ठरतं असून शिवसेना पक्षाच्या अडचणी वाढवताना दिसून येत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी, आघाडी सरकार विरोधकांचं तर मुळीच ऐकत नाही आता किमान आपल्या पक्षाच्या आमदारांचं तरी ऐकतील,असा टोला सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.