छत्रपती संभाजी महाराज आणि ‘कबुतर’ प्रकरणावर विधान परिषदेत गदारोळ
राणे-परब यांच्यात तीव्र खडाजंगी, विधान परिषद तीन वेळा तहकूब

मुंबई प्रतिनिधी: विधान परिषदेत आज छत्रपती संभाजी महाराज आणि ‘पिजन होल’ (कबुतर प्रकरण) यावरून मोठा गदारोळ पाहायला मिळाला. आमदार अनिल परब यांनी स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांशी केली आणि राज्यपालांच्या अभिभाषणात ‘पिजन होल’ असा उल्लेख केला. या विधानामुळे सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आणि परब यांनी माफी मागावी, अशी मागणी केली.
यावरून मंत्री नितेश राणे आणि परब यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. दोन्ही बाजूंच्या आमदारांनी घोषणाबाजी सुरू केली, त्यामुळे सभागृहाचे काम तीन वेळा तहकूब करावे लागले. सभापती राम शिंदे यांनी हस्तक्षेप करत सदस्यांना शांत राहण्याचे आवाहन केले, मात्र गोंधळ सुरूच राहिला.
संभाजी महाराजांशी तुलना, सत्ताधाऱ्यांचा संताप
राज्यपालांच्या अभिभाषणावर भाष्य करताना अनिल परब म्हणाले, “संभाजी महाराजांचा धर्म बदलण्यासाठी छळ करण्यात आला. तसाच माझा छळ पक्ष बदलण्यासाठी केला जात आहे. मला ईडी आणि सीबीआयच्या नोटिसा पाठवल्या गेल्या.”
परब यांच्या या विधानाने सत्ताधारी पक्षाचे आमदार चांगलेच आक्रमक झाले. मंत्री शंभूराज देसाई आणि भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी परब यांनी सभागृहात माफी मागावी, अशी मागणी लावून धरली.
राणे-परब यांच्यात तीव्र वाद
यावेळी मंत्री नितेश राणे यांनी परब यांच्यावर वैयक्तिक टीका केली.”महाविकास आघाडी सत्तेत असताना लोकांची घरे पाडली गेली. परंतु, एका कारकुनाचा कोणी छळ करू शकत नाही. यांच्याच सरकारने केंद्रीय मंत्र्याला अटक केली. आता जैसी करणी वैसी भरणी होत आहे. मातोश्रीची फरशी चाटण्याचे काम परब यांनी केले आहे,” असा आरोप राणे यांनी केला.
राणे यांच्या आरोपांना परब यांनी तीव्र प्रत्युत्तर दिले.”संभाजी महाराज माझे दैवत आहेत. मी काही चुकीचे बोललो असेल, तर सभापतींना कारवाईचा अधिकार आहे. मात्र, कोणीही उठतो आणि काहीही बोलतो. आज राणे कुटुंबाच्या नावावर चार-चार खून आहेत. हे खुनी लोक आम्हाला शिकवणार का? हे लोक खुनी आहेत. स्वतः मातोश्री चाटून-चाटून इथपर्यंत आलेत. आता हे आम्हाला सभ्यता शिकवणार का?” असे परब म्हणाले.
परब यांच्या या वक्तव्याने सभागृहात मोठा गदारोळ निर्माण झाला. सत्ताधारी आणि विरोधक दोघेही आक्रमक झाल्याने सभापतींनी तीन वेळा सभागृह तहकूब करण्याचा निर्णय घेतला.
विरोधकांची दिलगिरी, वादावर पडदा
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात झालेल्या वादाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संसदीय शब्द वगळण्याची सूचना करत, वाद मिटवण्याचे आवाहन केले.
सभापतींनी शेवटी जाहीर केले की, “असंसदीय आणि वैयक्तिक संवाद कामकाजातून काढून टाकला जाईल,” आणि यावर वाद मिटवण्याचा निर्णय घेतला.
सभागृहातील राड्यामुळे कामकाजावर परिणामसभागृहात झालेल्या या वादामुळे महत्त्वाच्या चर्चांना बाधा आली. विधान परिषद तीन वेळा तहकूब करावी लागल्याने गंभीर विषयांवरील चर्चा लांबणीवर पडली.
सत्ताधारी आणि विरोधकांमधील हा संघर्ष लवकर थांबण्याची चिन्हे नाहीत, त्यामुळे विधान परिषदेतील वातावरण येत्या काही दिवसांत आणखी तापण्याची शक्यता आहे.