मराठा समाजाच्या हिताचा तोडगा निघाला; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: मराठा आरक्षणासाठी गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला यश आलं आहे. सरकारचा जीआर स्वीकारल्यानंतर मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते लिंबू पाणी पिऊन आपलं बेमुदत उपोषण संपवलं. याप्रकरणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मनोज जरांगे यांनी उपोषण सोडले याचा मला आनंद आहे. तसेच मंत्रिमंडळ उपसमितीने आज मराठा समाजाच्या हितासाठी चांगला तोडगा काढला आहे. मनोज जरांगे यांचे उपोषण आता संपलेले आहे. खरं म्हणजे हैदराबाद गॅझेट लागू करण्यासाठी आमची सुरुवातीपासूनच तयारी होती. पण मनोज जरांगे यांची सरसकट कुणबी प्रमाण द्यावे, या मागणीला कायदेशीर अडचणी होत्या. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे निर्णय लक्षात घेता सरसकट मराठा समाजाला आरक्षण देणे शक्य नव्हते. त्यामुळे हीच वस्तूस्थिती मनोज जरांगे यांच्या टीमच्या लक्षात आणून देण्यात आली, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपल्या कायद्याप्रमाणे आणि देशाच्या संविधानाप्रमाणे आरक्षण हे समूहाला नव्हे तर व्यक्तीला मिळत असते. त्यामुळे संबंधित व्यक्तीने ते आरक्षण मागायचं असतं. परंतु सरसकट आरक्षण कायद्याच्या पताळीवर टिकणार नाही, हे मनोज जरांगे यांच्या टीमला सांगण्यात आले. त्यानंतर मनोज जरांगे यांनीदेखील ही भूमिका समजून घेतली. कायद्यात सरसकट आरक्षण बसत नसेल तर ते करू नका, असे मनोज जरांगे यांनी सांगितले. त्यानंतर मंत्रिमंडळ उपसमितीने चर्चा केली आणि जीआर तयार झाला, असे फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आले.
मनोज जरांगेंकडून वारंवर टीका करण्यात आली, असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, माझ्यावर टीका झाली तरीही मी जराही विचलित झालो नाही. कारण समजाला न्याय देणे हेच माझं ध्येय होतं. तसेच न्याय देताना दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही आणि अन्यायाची भावना निर्माण होणार नाही, असा कायदेशीर निर्णय करावा लागेल. यासाठी मराठा असो, ओबीसी असो वा महाराष्ट्रातील कोणताही समाज असो, प्रत्येक समाजासाठी काम करणं हे माझं कर्तव्य समजतो. त्या कर्तव्यावेळी कधी शिव्या मिळतात तर कधी फुलांचे हार देखील मिळतात, असे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले.