ब्रेकिंगवैद्यकीय

एकावेळी अनेक पॅथालॉजीमध्ये वैद्यकीय अहवालांवर स्वाक्षरी करणाऱ्या डॉ. राकेश दुग्गल यांच्यावर कारवाईचा बडगा,एक वर्षासाठी केली नोंदणी रद्द

मुंबई- एकावेळी अनेक पॅथालॉजी लॅब मध्ये प्रत्यक्ष न जाता वैद्यकीय अहवालावर स्वाक्षरी करून   नियमांचे उल्लंघन करत असलेल्या डॉ. राकेश दुग्गल व डॉ. राजेश सोनी यांच्यावर महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने कारवाईचा बडगा उगारला आहे.

तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, डॉ. दुग्गल यांची सांताक्रूझ येथे स्वतःची लॅब असताना ते वसई, विरार, जोगेश्वरी, अंधेरी, कौसा, मुंब्रा, विक्रोळी, घाटकोपर, ठाणे, प्रभादेवी, चांदिवली, मालाड, नालासोपारा येथील प्रयोगशाळांच्या अहवालांवर स्वाक्षरी करत होते.

वैयक्तिकरित्या प्रत्येक ठिकाणी जाऊन रुग्णांचे अहवाल तपासणे व त्यानंतर स्वाक्षरी करणे शक्य नसले तरीही पैसे मिळवण्यासाठी ते स्वाक्षरी करत होते. तक्रारीनंतर महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने चौकशी करून त्यांना नोटीस बजावली होती. डॉ. दुग्गल यांनी यासंदर्भात २ जुलै २०१८ रोजी स्पष्टीकरण देखील सादर केले होते. मात्र, पुन्हा महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेद्वारे २० मार्च २०२० रोजी त्यांच्या विरोधात आरोपपत्र सादर करण्यात आले.

त्या आरोपपत्रानुसार सर्व अहवालांवर एकाच तारखेला म्हणजे ३ फेब्रुवारी रोजी स्वाक्षरी करण्यात आली होती. परिषदेने यासंदर्भात विचारणा केल्यानंतर दुग्गल यांनी त्याचे उत्तर दिले नाही. पॅथालॉजी असोसिएशनकडून हे प्रकरण मागे घेण्यासंदर्भातील खोटे बनावट प्रतिज्ञापत्र देण्यात आले. यासंदर्भात डॉ. दुग्गल यांना खुलासा विचारला असता त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही.

२० नोव्हेंबर २०२१ रोजी अंतिम चौकशीमध्ये डॉ. दुग्गल दोषी असल्याचे निष्पन्न झाले. या अहवालावर स्कॅन स्वाक्षरी आहे. डॉ. दुग्गल यांनी या प्रयोगशाळांना भेट दिली नसल्याचे या चौकशीत स्पष्ट झाले. आधीच स्वाक्षरी केलेले पॅड त्यांनी दिले होते. त्यामुळे डॉ. दुग्गल यांची नोंदणी एक वर्षाच्या कालावधीसाठी रद्द करण्यात आली.

मात्र, ही शिक्षा अपुरी असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ही नोंदणी रद्द करून रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या अशा प्रवृत्तींना रोखण्यासाठी एफआयआर नोंदवायला हवा. दुर्देवाने अशी तरतूद नसल्याने या प्रकारांना चाप लागत नाही व हे प्रकार एक वर्षानंतरही सुरुच राहतात. दुसऱ्या अशाच प्रकरणात डॉ. सोनी यांची नोंदणी सहा महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!