चाकरमान्यांची पुन्हा तारांबळ! कोकण रेल्वेच्या जादा गाड्यांना ५ ते ६ तासांची रखडपट्टी

मुंबई : सुट्टी निमित्त कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात आलेल्या जादा गाडय़ांची पाच ते सहा तास रखडपट्टी होत आहे. कोकण रेल्वेच्या नियमित गाडय़ा आणि अतिरिक्त गाडय़ांच्या वेळेचे नियोजन करण्यात अडचणी येत आहेत.त्याचा अधिक फटका जादा गाड्यांना बसत आहे. त्यामुळे अधिकचे पैसे मोजून जादा गाडय़ांची तिकिटे काढलेल्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत.
मुलांच्या वार्षिक परीक्षा संपल्याने कुटुंबीयांना सोबत घेऊन मोठ्या प्रमाणावर चाकरमान्यांनी गावाकडे मोर्चा वळवला आहे. तुलनेत कोकणात जाणाऱ्या मुंबईकर, ठाणेकरांचे प्रमाण अधिक आहे. त्यांच्या सोयीसाठी मध्य आणि कोकण रेल्वेने यंदाही उन्हाळी विशेष गाडय़ा सोडल्या आहेत. रेल्वे प्रशासनाचा नियमित गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत होऊ न देण्यावर भर असतो. त्या नियमित गाड्यांच्या वेळा सांभाळून अतिरिक्त उन्हाळी गाडय़ा चालवताना रेल्वे प्रशासनाला कसरत करावी लागत आहे. अनेकदा नियमित गाडय़ांसाठी मार्ग मोकळा करून देताना जादा गाडय़ांना सायडिंगला ठेवले जात आहे. त्यात प्रत्येक वेळी जवळपास अर्धा तास खर्ची जात आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे येथून उन्हाळी विशेष गाडय़ांतून सिंधुदुर्गात जाणारे चाकरमानी पाच ते सहा तास उशिराने आपल्या गावी पोहोचत आहेत.