हंबीरराव सिनेमाचा डंका दक्षिणेतही,अभिनेता प्रभासने शेअर केला ‘सरसेनापती हंबीरराव’ सिनेमाचा टिझर

मुंबई:- छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास मोठ्या पडद्यावर साकारण्यासाठी मराठीतील दिग्गज दिग्दर्शक सध्या मोठी मेहनत करत आहे.अशातच प्रविण तरडे दिग्दर्शित आणि लिखित सरसेनापती हंबीरराव हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमांमधून ‘मराठेशाही’चा इतिहास प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जीवनावर आधारित बायोपिक या सिनेमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
या सिनेमाचा टिझर नुकताच दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे याने आपल्या सोशल मीडिया वरून शेअर केलाय. या सिनेमासाठी टिझर सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून या सिनेमाचा डंका थेट दक्षिणेत सुद्धा वाजू लागला आहे.
बाहुबली फेम अभिनेता प्रभास याने सरसेनापती हंबीरराव या सिनेमाचा टिझर आपल्या सोशल मीडिया वरून शेअर करत या सिनेमाच्या टीमवर आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. प्रभासने शेअर केलेला हा टिझर सोशल मीडियावर चर्चेत असून मराठी कलाकारांचं कौतुक या माध्यमातून होताना दिसत आहे.





