
सिंधुदुर्ग – कुडाळच्या गणेशोत्सव काळातल्या नियोजनाची बैठक गुरुवारी झाली आणि आज लागलीच सर्व प्रशासन ऍक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळाले. कुडाळ शहरात सुलभा हॉटेल पासून एसआरएम कॉलेज चौक, पोलीस स्टेशन ते पोस्ट ऑफिस चौक पर्यंतच्या रस्त्यावर येणारे अतिक्रमण प्रशासनाने बाजूला करायला लावले. आज सायंकाळी उशिरा प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूशे, तहसीलदार वीरसिंग वसावे, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता धीरज पिसाळ, नगर पंचायतचे स्वच्छता निरीक्षक संदीप कोरगावकर असे सारेच प्रशासन यासाठी संयुक्तपणे या कारवाईत उतरल्याने अतिक्रमण करणाऱ्याचे मात्र चांगलेच धाबे दणाणले.
दुतर्फा नगरपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत लावण्यात आलेले स्टॉल, बॅनर प्रशासनाने आज सायंकाळी केलेल्या संयुक्त पाहणीत हटविण्याच्या सुचना त्या – त्या स्टॉल मालक व दुकानदारांना यावेळी देण्यात आल्या यावेळी काही बॅनर आणि बोर्ड तात्काळ काढण्यात आले. प्रशासनाच्या या संयुक्त मोहिमेमूळे रस्ता दुतर्फा अतिक्रमण केलेल्या व्यवसायिकांचे धाबे दणादणले आहेत. दरम्यान नगरपंचायत विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत अतिक्रमण केलेल्या स्टॉल धारकांना तात्काळ नोटीस काढून कारवाई करा असे आदेश संबंधित विभागाच्या अधिकार्यांना आपण दिल्याचे प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी सांगितले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर गुरूवारी कुडाळ मराठा हॉल येथे नियोजनाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत कुडाळ मधील प्रमुख मंडळींनी रस्ता दुतर्फा प्रशासनाच्या जागेवर करण्यात आलेल्या अतिक्रमणाबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यानुसार प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी बैठक झाल्यानंतर दुसर्याच दिवशी शुुक्रवारी सर्व प्रशासकीय यंत्रणांना सोबत घेत हि मोहिम संयुक्तरित्या सुरू केली. यावेळी कुडाळ तहसिलदार विरसींग वसावे, कुडाळ पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम, कुडाळ नायब तहसिलदार संयज गवस, कुडाळ सार्वजनिक बांधकाम उपविभागचे उपअभियंता धीरज पिसाळ, स्थापत्य सहाय्यक विजय गोरे, कुडाळ नगरपंचायतचे स्वच्छता निरीक्षक संदिप कोरगावकर, नगरपंचायत बांधकाम विभागाचे संकेत गावडे, मंडळ अधिकारी एस.एस.पास्ते, पोलिस हवालदार मंगेश शिंगाडे, संजय कदम, कोतवाल बाबु चव्हाण आदि अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
कुडाळ जिजामाता चौक ते तहसिल मार्गावरील सुलभा हॉटेल समोर असलेल्या शासकीय जागेवर लावण्यात आलेल्या कपड्याच्या स्टॉल मालकाला हा स्टॉल तात्काळ हटवा, याठिकाणी हा स्टॉल लावू शकत नाही अशा सक्त सुचना पोलिस निरीक्षक श्री. मगदूम यांनी दिल्या. त्यांनतर एसआरएम कॉलेज चौक ते पोलिस स्टेशन व पोस्ट ऑफीस पर्यंत उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचार्यांनी पायी चालत बांधकाम विभाग व नगरपंचायत विभागाच्या अंतर्गत येणार्या रस्ता दुतर्फा उभारण्यात आलेले स्टॉल, बॅनर तात्काळ हटविण्याच्या सुचना दिल्या. यावेळी उपस्थित प्रशासनाच्या कर्मचार्यांनी काही बॅनर बाजुला काढून ठेवले. तरी काही व्यवसायिकांनी स्वतःहून बाहेर लावलेले बॅनर काढून ठेवत प्रशासनाला सहकार्याची भुमिका दाखविली. या मोहिमेदरम्यान एकाही राजकीय मंडळींनी हस्तक्षेप केला नाही. मात्र काही राजकीय किनार असलेल्या मंडळींनी आम्ही आमच्या वरिष्ठांना बोलून घेतो असे सांगितले. मात्र उपस्थित अधिकार्यांनी शहरवासियांच्या मागणीनूसारच ही मोहिम सुरू असल्याचे सांगुन आपली संयुक्त मोहिम उशिरापर्यंत सुरू ठेवली होती.
मात्र आजच्या या मोहिमेत नगरपंचायतचे सीईओ आणि अभियंत्यांची अनुपस्थिती मात्र खटकली अधिक चौकशी केली असता मुख्याधिकारी मुंबईला तर अभियंता रजेवर असल्याच समजल. पण एकंदरीतच गणेशोत्सव नियोजनाच्या पर्शाभूमिव्र सर्व प्रशासन यंत्रणांनी घेतलेली हि भूमिका अतिक्रमण करणाऱ्यांसाठी आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांसाठी वेक अप कॉल ठरली आहे.