प्लास्टिक बंदीविरोधात कारवाई करणाऱ्या सरकारी पथकावर व्यापाऱ्यांनी फेकले कांदे

कल्याण- कल्याणमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याणमध्ये प्लास्टिक पिशव्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या सहाय्यक आयुक्त व त्यांच्या पथकावर एपीएमसी मार्केटमधील व्यापाऱ्यांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. लाईट बंद करत शिवीगाळ करत पथकाला कांदे फेकून मारल्याची घटना याठिकाणी घडली आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात महापालिकेकडून प्लास्टिक बंदीबाबत ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर आज केडीएमसीचे सहाय्यक आयुक्त सुधीर मोकल आपल्या पथकासह सकाळच्या सुमारास एपीएमसी मार्केटमध्ये कारवाई करण्यास गेले होते. कारवाईदरम्यान मार्केटमधील व्यापाऱ्यांच्या दुकानांवर सहाय्यक आयुक्त मोकल व त्यांच्या पथकाने धाड घालण्यास सुरुवात केली. काही क्षणातच व्यापाऱ्यांनी लाईट बंद करून या पथकाला शिवीगाळ करत त्यांना कांदे फेकून मारले.
या प्रकरणी रीतसर तक्रार केली जाणार असल्याचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले असून या घटनेचा महानगरपालिका कामगार संघटनेकडून निषेध नोंदविण्यात आला आहे.