पटोलेंमुळे पटेना…!

इतिहासकाळापासून ‘मराठे लढाईत जिंकतात पण तहात हरतात’ असं म्हटलं जातं. तसंच काहीसं चित्र आताही आहे. महाराष्ट्रात सध्या राजकीय महाभारत सुरु झालं आहे. महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी थेट लढाई यावेळी विधानसभा निवडणुकीत होणार आहे. याला तिसऱ्या आघाडीचाही अँगल असला तरी तो ‘कोन’ काहीसा महायुतीच्या बाजूने झुकलेला आहे. तसाच जरांगेंचा चौथा ‘कोन’ माविआला पुरक ठरण्याची शक्यता आहे. आता अवघे 32 दिवस प्रत्यक्ष मतदानाला शिल्लक आहेत. पण अजूनही दोन्ही बाजूंकडून जागावाटपाचे ‘घोडे’ अडलेलेच आहे. लोकसभेत चांगला परफॉर्मन्स दिल्यामुळे मविआत काँग्रेस अॅग्रेसिव्ह मोडमध्ये आहे तर हरियाणाचा निकाल बाजूने लागल्याने महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाची वारू जोरात आहे. पण आघाडी- युतीच्या राजकारणात प्रत्येक पक्षाला समंजस भूमिका घ्यावीच लागते. टोकाच्या भूमिकेमुळे आघाडी असो वा युती, यामध्ये तणाव निर्माण होतोच.
मविआमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि महायुतीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी या दोन्ही धुर्त पक्षांचा आवाज वरवर तरी समंजस आहे. पण दोन्ही शिवसेना आणि काँग्रेस-भाजप या पक्षांची निवडणुकीपूर्वी आपल्याच मित्र पक्षांबरोबर चांगलीच जुंपली आहे. महाविकास आघाडीत तर शुक्रवारी स्फोटच झाला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या विरोधात रणशिंगच फुंकले. पटोले बैठकीला असतील तर आम्ही बैठकीला येणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतली. प्रदेशाध्यक्ष म्हणजे पक्षाचा राज्यप्रमुख असतो. त्या प्रमुखाबाबतच अशी भूमिका सेनेने ऐन तिकीटवाटपाच्या तोंडावर घेतल्याने माविआच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. नाना पटोलेंच्या कार्यपद्धतीबाबत बऱ्याच महिन्यांपासून असंतोष आहे. त्यांच्या पक्षातील बरेच ज्येष्ठ नेतेही नानांच्या कार्यपद्धतीवरून नाराज असल्याचे समजते. तसेच शरद पवारांचा पक्षही नानांवर तितकासा खुष नाही. पण काँग्रेसी पद्धतीनुसार नानांना असलेला हा विरोध त्यांनी कधीही माध्यमांसमोर येऊ दिला नाही. याबाबत थोडीशी कोणीतरी, कधीतरी कुजबूज करायचे, तेवढेच. शरद पवार आणि अन्य काँग्रेस नेत्यांनी ‘नाना’ तक्रारी राजधानीत कधीच केल्या आहेत. पण आता सेनेने माध्यमांसमोरच विरोधाची भूमिका घेतल्याने हा मोठा चर्चेचा विषय झाला आहे. तसं बघितलं तर माविआचं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार असतानाच नानांविषयी नाराजीचा सूर निघण्यास सुरुवात झाली होती. त्यावेळी त्यांनी कोणालाही विश्वासात न घेता विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतरच ऐतिहासिक शिंद्यांचा सुरती उठाव झाला आणि महायुतीचे सरकार महाराष्ट्रात अस्तित्वात आले.
मात्र नानांच्या ‘त्या’ राजीनाम्याचं गुपित अजूनही उघड झालेलं नाहीय. अशा ‘नाना’ हरकती केलेले नाना नंतर काँग्रेसच्या राज्य प्रमुखपदावर आले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची अतिसरळ आणि बाळासाहेब थोरातांची अतिसंयमी अशी प्रतिमा असल्याने नानांच्या गळ्यात राज्याच्या पक्षाध्यक्षपदाची माळ पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदींना एकेकाळी नानांनी भाजपमध्ये असताना भारतातून प्रथम आव्हान दिले होते. (त्यामुळेच त्यांना भाजपमधून बाहेर पडावे लागले.) हा इतिहास अवगत असल्याने काँग्रेसच्या दिल्लीकर पक्षश्रेष्ठींना नानांसारख्या ‘अॅग्रेसिव्ह लीडर’ महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्यात पाहिजे होता. शिवसेनेसारख्या आक्रमक व राष्ट्रवादीसारख्या धुर्त पक्षाबरोबर वाटाघाटी करताना आपला माणूस नरम पडू नये म्हणून काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी नानांना राज्यातील सर्वात महत्त्वाचे पद दिले. नानांनी पक्षश्रेष्ठींचा हा हेतू काहीप्रमाणात साध्यही केला. पण आता नानांच्या दुसऱ्या बाजूमुळे काँग्रेसच नव्हे तर मविआही संकटात सापडली आहे. त्यात नानांची फडणवीसांसोबत छुपी युती असल्याच्या बातम्याही अधूनमधून माध्यमांमध्ये येत असतात. नाना वरवर आक्रमक असले तरी ते फडवीसांना नेहमीच पूरक भूमिका घेतात, असंही बोललं जातं.
पन्नास वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाची सूत्रे बऱ्यापैकी पश्चिम महाराष्ट्रातून हलत. आता हा केंद्रबिंदू बऱ्यापैकी विदर्भात आला आहे. त्यामुळे पक्ष कोणताही असो, पटोले व फडणवीसांमध्ये हे ‘विदर्भ कनेक्शन’ स्ट्राँंग असल्याचं वारंवार दिसून येतं. (हे दोघेही नेते कट्टर विदर्भवादी आहेत.) आताही काँग्रेसच्या तिकीटवाटपात नानांची बऱ्यापैकी एकाधिकारशाही असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण व बाळासाहेब थोरात या पश्चिम महाराष्ट्री नेत्यांबरोबरच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, महिला नेत्या यशोमती ठाकूर, माजी मंत्री नितीन राऊत हे वैदर्भीय नेतेही नानांवर तितकेसे खुष नसल्याचे समजते. त्यात आता नानांना समोर संजय राऊतांसारखा धुरंधर ‘सेनापती’ गाठ पडला आहे. ‘एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत’, असं म्हटलं जातं. त्याप्रमाणे पटोले व राऊतांनी आता ऐनवेळी आपापल्या तलवारी परजल्या आहेत. या दोघांना आत शांत व संयत ठेवणे हे जिकरीचं ठरणार आहे. ‘शिकारीची वेळ आणि कुत्र्याला झालं शौचाला’, असं तळकोकणात म्हणतात. त्याप्रमाणे ऐन रणांगणावर शत्रू समोर असताना मित्रपक्षांमध्येच जोराची जुंपल्याने महाविकास आघाडीत अस्वस्थता पसरली आहे. ही अस्वस्थता लवकरात लवकर स्वस्थतेत बदलली नाही तर ऐन राजकीय युद्धावेळी मविआची मोठी फसगत होण्याची दाट शक्यता आहे.
– शाम देऊलकर