रत्नागिरी जिल्ह्यात सागरी पर्यटनाला गती ; क्रुझ टर्मिनल उभारले जाणार, विमानतळासह मुंबई-गोवा महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात

रत्नागिरी : रत्नागिरीमधील विमानतळासाठी तरतूद केलेल्या 147 कोटींच्या निधीतून हे काम प्रगतिपथावर आहे. जिल्ह्यातील सागरी पर्यटनाला चालना देण्यासाठी कुझ टर्मिनल उभारले जाणार आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे कामही लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी विधिमंडळात अर्थसंकल्प सादर करताना भाषणात व्यक्त केला. मागील वर्षी रत्नागिरी विमानतळाच्या टर्मिनल कामासह अन्य कामांसाठी 147 कोटींचा निधी देण्यात आला होता. यातून रत्नागिरी विमानतळाच्या प्रवासी वाहतूक टर्मिनलचे काम हाती घेण्यात आले आहे.
यासाठी आवश्यक असणाऱ्या जागेचेही भूसंपादन झाले असून, प्रवासी टर्मिनलचे काम वेगाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्यटन वाढीच्या दृष्टीने विशेषतः सागरी पर्यटन वाढीला मोठा वाव असून, या ठिकाणी क्रुझ टर्मिनलही मंजूर झालेले आहे. याचे कामही लवकरच सुरु होणार आहे. सागरी पर्यटन वाढीसाठी विशेष लक्ष दिले जाणार आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे कामही वेगाने व लवकरात लवकर पूर्ण केले जाणार असल्याची माहितीही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली.