संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची होणार प्रशासकीय पुनर्रचना..
वन्य जीवांच्या संरक्षण,संवर्धनासोबतच पर्यटन विकासाचे उद्दिष्ट

मुंबई:सिमेंटच्या शहरातील हरितपट्टा किंवा मुंबई शहराचे फुफ्फुस म्हणून ओळखल्या जाणा-या आणि जैव विविधतेने समृध्द असलेल्या बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन्य जीवांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी तसेच पर्यटन विकासाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या राष्ट्रीय उद्यानाची प्रशासकीय पुनर्रचना करण्यात आली असून दोन स्वतंत्र कार्यालयांची स्थापना करण्यात आली आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान विभागाअंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व तुंगारेश्वर ही दोन संरक्षित क्षेत्रे आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रफळ सुमारे १०४. ४४ चौरस किमी तर तुंगारेश्वर अभयारण्याचे क्षेत्रफळ सुमारे ८५. ७० चौर किमी चौरस किमी आहे.
या उद्यानात २७४ पेक्षा अधिक पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात. प्राण्यांच्या ३५ , सरपटणाऱ्या आणि उभयचर प्राण्यांच्या ७८ फुलपाखरांच्या १७० प्रजाती उद्यानात आहेत. उद्यानात १ हजार १०० पेक्षा अधिक वृक्ष प्रजाती आहेत. उद्यानाच्या मध्यभागी बौद्धकालीन कान्हेरी गुंफा आहेत. हे जंगल मुक्तपणे विहार करणाऱ्या बिबट्यांचे वास्तव्य आहे.
निसर्ग भ्रमंती सहल, पक्षीनिरीक्षण, फुलपाखरू निरीक्षण असे पर्यटकांचा आनंद द्विगुणित करणारे व समृद्ध अनुभव देणारे उपक्रम या उद्यानात आखले जातात. उद्यानातील तंबू संकूलामध्ये आरामदायी निवासाची व्यवस्था आहे. उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून हाकेच्या अंतरावर एक कृत्रिम तलाव आहे. ज्यात नौकाविहाराची सुविधा आहे. वनराणी ही मिनी ट्रेन या जंगलातील राणी असून पर्यटक त्यात ही बालपर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र आहे. सिंह आणि व्याघ्र सफारी मुळे पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
दोन कार्यालयांची स्थापना
या पार्श्वभूमीवर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची प्रशासकीय पुनर्रचना होणार आहे. उद्यानाचे वन संरक्षक व संचालकांच्या अधिपत्याखाली दक्षिण उपसंचालक(बोरीवली) व उत्तर उपसंचालक (येऊर) अशी दोन स्वतंत्र प्रशासकीय कार्यालयांची स्थापना करण्याचा निर्णय महसूल व वन विभागाने घेतला आहे.दक्षिण विभागाच्या उपसंचालकाच्या अखत्यारित राष्ट्रीय उद्यानाचे पर्यटन क्षेत्र, कृष्णगिरी उपवन, तुळशी तलाव व आसपासचे वनक्षेत्र, व्याघ्र व सिंह सफारीचा समावेश असेल. पर्यटन विकासाची कामे, वन्यजीव बचाव, अतिक्रमण निर्मुलन-संरक्षण व मिनी झूचे व्यवस्थापाचा यामध्ये समावेश राहिल तर उत्तर विभागाच्या उपसंचालकाच्या अख्यत्यारित तुंगारेश्वर परिसरातील अतिक्रमण निर्मुल, वन्यजीव व्यवस्थापनाचे कामकाज असेल.






