महाराष्ट्रमुंबईराजकीय

सत्तेत नसतानाही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावे भरवणार: हर्षवर्धन सपकाळ

काँग्रेसच्या रोजगार मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद, शेकडो तरुणांची निवड

प्रदेश काँग्रेसचे मुखपत्र जनमानसाची ‘शिदोरी’च्या ‘बेरोजगारीच दाहक वास्तव’ विषेशांकाचे प्रकाशन.
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?

मुंबई : देशात बेरोजगारीची समस्या सर्वात मोठी असून उच्च शिक्षण घेऊनही तरुणांना नोकरी मिळत नसल्याचे भयावह चित्र आहे. सत्तेतील भाजपाने नोकरीचे आश्वासन देऊन तरुणांची फसवणूक केली आहे, परंतु काँग्रेस पक्षाने सध्या सत्तेत नसतानाही तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत शेकडो तरुणांच्या हाताला काम व डोक्याला विचार देण्याचे काम केले आहे. यापुढे असे रोजगार मेळावे राज्यातील सर्व जिल्ह्यात घेतले जातील, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या रोजगार विभागाने टिळक भवनमध्ये आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन काँग्रेस प्रदेशाध्यांनी केले. यावेळी विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार भाई जगताप, माजी खासदार कुमार केतकर, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड गणेश पाटील, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी आमदार अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, भूषण पाटील, सरचिटणीस व रोजगार स्वयंरोजगार विभागाचे प्रमुख, रोजगार मेळाव्याचे समन्वयक धनंजय शिंदे आदी उपस्थित होते. आयटी, बँकिंग, विमा, अशा विविध क्षेत्रातील ७५ कंपन्यांनी मेळाव्यात सहभागी होऊन शेकडो तरुणांची निवड केली.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राज्यात २.५ लाख सरकारी पदे रिक्त आहेत, केंद्रात २.५ कोटींपेक्षा जास्त जागा रिक्त आहेत परंतु भाजपाचे सरकार या रिक्त जागांवर भरती करत नाही. दरवर्षी २ कोटी रोजगार देणार, मेगाभरती करणार या वल्गणा हवेतच विरल्या आहेत. भाजपा सरकार तरुणांच्या हाताला काम न देता शोषणावर आधारीत समाज निर्माण करत आहे. भाजपाच्या राज्यात श्रीमंत व गरीब यांच्यातील दरी वाढत आहे. राष्ट्रपुरुष, राष्ट्रसंत असतात तसे भाजपा राजवटीत दोन राष्ट्रीय शेठ असून त्यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरले जात आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले की, बेरोजगारीचा दर ८ टक्यांपेक्षा जास्त असून ४०-४५ वर्ष वय झाले तरी नोकरी मिळत नाही असे चित्र आहे. महाराष्ट्रातील रोजगार दुसऱ्या राज्यात जात आहेत. पुण्यातील आयटी कंपन्यांही दुसऱ्या राज्यात गेल्या आहेत. भाजपा सरकारच्या काळात राज्यातील अनेक उद्योग व गुंतवणूकही दुसऱ्या राज्यात गेली आहे. जात व धर्माच्या नावाखाली वाद निर्माण करून परिस्थिती गढूळ बनवल्याने राज्यात रोजगार निर्माण कसे होणार, असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. आमदार भाई जगताप यावेळी म्हणाले की, काँग्रेसने आज करुन दाखवले आहे पण ज्यांनी नोकरी देण्याचे आश्वासन दिले त्यांनी ते पूर्ण केले नाही. तरुण, महिला व विद्यार्थ्यांच्या संघटना निर्माण करण्याचे काम सर्वात प्रथम काँग्रेस पक्षाने केले आहे. आज काँग्रेस पक्षाने अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवला असून असे रोजगार मेळावे भरवले पाहिजेत असेही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना ७५ व्या वाढदिवसानिर्मित काय शुभेच्छा देणार, या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, वयाच्या ७५ नंतर वानप्रस्थाश्रमात जावे असे रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सुचनेनुसार नरेंद्र मोदी आता राजधर्माचे पालन करणार का? तसेच लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांची ७५ वर्षाचे कारण देत जशी मार्गदर्शक मंडळात रवानगी केली तसेच मोदीही त्या मंडळात जाण्याचा मार्ग अवलंबणार का? अशी विचारणा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुखपत्र शिदोरीच्या बेरोजगारचं दाहक वास्तव या विषेशांकाचे प्रकाशन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!