सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदी मनिष दळवी तर उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर यांची निवड

सिंधुदुर्ग- सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेची निवडणूक पार पडल्यानंतर आता या जिल्हा बॅंकेच्या नूतन अध्यक्षांची निवड पार पडली.यात अध्यक्षपदी मनिष दळवी तर उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर यांची निवड करण्यात आली.यावेळी या दोन्ही नवनिर्वाचित अध्यक्षांना शुभेच्छा देण्यासाठी स्वत: केद्रिंय मंत्री नारायण राणेंनी उपस्थित राहून दोघांनाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान माध्यमांशी बोलताना,’सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठं-मोठी लोकं आली आणि अकलेचे तारे तोडून गेली’ असा टोला राज्याचे उपमु्ख्यमंत्री अजित पवार यांना राणेंनी लगावला.याचसोबत,’आपल्याला जिल्हा बँकेचा कारभार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोरगरीब, शेतकरी, मजुर यांच्यासाठी करायचा आहे हे लक्षात ठेवून नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्ष प्रामाणिकपणे काम करतील हा माझा विश्वास आहे’,असं मत नारायण राणे यांनी व्यक्त केलं.
अश्यातच संतोष परब मारहाण प्रकरणी अज्ञातवासात असणारे आमदार नितेश राणे अखेर १८ दिवसांनी माध्यमांसमोर आले. आज कोर्टाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील नूतन अध्यक्षांची भेट घेत त्यांचं अभिनंदन केलं. यावेळी त्यांना भेटण्यासाठी समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.