स्वतः करायचे आणि त्याचे खापर इतरांवर फोडायचे हा नितेश राणे यांचा पूर्वीपासूनचा धंदा -खासदार विनायक राऊत

सिंधुदुर्ग:- किरण सामंत विरुद्ध विनायक राऊत हा नसलेला वाद आमदार नितेश राणे यांनी लावलेला जावईशोध आहे. स्वतः करायचे आणि त्याचे खापर इतरांवर फोडायचे हा नितेश राणे यांचा पूर्वीपासूनचा धंदा आहे.कणकवली विजय भवन मध्ये शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, संजय आग्रे, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, युवासेना समन्वयक राजू राठोड, संदेश सावंत- पटेल, राजू रावराणे,शांताराम रावराणे आदी उपस्थित होते.
यावेळी खासदार राऊत म्हणाले, आमदार नितेश राणे यांनी माझ्याबरोबरच किरण सामंत व आमदार वैभव नाईक यांची चिंता करू नये. त्यांनी स्वतःची चिंता करावी.
किरण सामंत लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत का? असा प्रश्न राऊत यांना विचारला असता लोकसभा निवडणुकीला अजून पुष्कळ दिवस आहेत. किरण सामंत इच्छुक असतील किंवा नसतील मला माहीत नाही. मात्र, इच्छुक कोणीही राहू शकतो, त्यात गैर असे काहीच नाही असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, स्वतःच्या कार्यकर्त्यांची डोकी फोडायची ही विकृती नारायण राणे यांच्या घराण्याने निर्माण केली आहे. ती शिवसेनेने केलेली नाही. तसेच जिल्हा बँकेमध्ये सतीश सावंत बाजी मारणार हे समजताच त्यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर हल्ला करण्यात आला. मात्र, आमचा पोलिसांवर विश्वास असून ते या प्रकरणातील खऱ्या आरोपींपर्यंत निश्चित पोहचतील. असेही राऊत म्हणाले.





