या राज्याने घेतला मोठा निर्णय! शेतकऱ्यांचं ‘इतक्या’ लाखांपर्यंतचं कर्ज होणार माफ

पंजाब – केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी लागू केलेले तीन काळे कृषी कायदे मागे घेण्याचे जाहीर करून सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला होता. अशातच मागच्या १ वर्षांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आले होते. आता त्या पाठोपाठ येणाऱ्या पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तेत असलेल्या पंजाब सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. सीएम चन्नी यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला आहे. पंजाब विधानसभा निवडणुकांच्या आधीच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा मोठा निर्णय पंजाब सरकारने घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे.
ज्या शेतकऱ्यांची ५ एकर पर्यंत जमीन आहे त्या शेतकऱ्यांना २ लाख रूपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय पंजाब सरकारने घेतला आहे. पंजाब सरकारनं घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी १० दिवसांत होणार असल्याचं मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी सांगितलं आहे. तसेच २ लाख रुपयांपर्यंच कर्ज माफ करण्याच्या निर्णयासोबतच भूमीहीन मजुरांचे देखील कर्ज माफ केले असल्याचं मुख्यमंत्री चन्नी यांनी सांगितलं आहे. पंजाब सरकारने घेतलेल्या कर्जमाफीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.