मुंबईत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन पर्यटनस्थळ! जंगल, डोंगर आणि समुद्राचा नजारा एका ठिकाणी‘तरंगता रस्ता’ सुरू
मुंबई : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्रात सुरु होणार नवीन पर्यटनस्थळ सुरु होणार आहे. महाराष्ट्राच नाही तर संपूर्ण देशभरात प्रसिद्ध असलेल्या आणि परदेशी पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या आपल्या मुंबईत हे पर्यटनस्थळ सुरु होणार आहे. एलिव्हेटेड फॉरेस्ट वॉकवे एलिव्हेटेड फॉरेस्ट वॉकवे अर्थात तरंगता रस्ता सुरु होणार आहे. सिंगापूरच्या धर्तीवर बांधण्यात आलेला हा फॉरेस्ट वॉकवेवरुन फिरताना जंगल, डोंगर, समुद्र सगळं एकत्रच पहायला मिळणार आहे.
दक्षिण मुंबईत निसर्गाच्या सान्निध्यात भ्रमंती करण्याचा पर्याय निसर्ग उन्नत मार्ग (एलिव्हेटेड नेचर ट्रेल) च्या माध्यमातून मुंबईकरांसह पर्यटकांना उपलब्ध होणार आहे. दक्षिण मुंबईत कमला नेहरू उद्यान आणि फिरोजशाहा मेहता उद्यान येथे वृक्षराजीच्या सान्निध्यात रपेट (ट्री वॉक) करण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. मुंबईतील पहिल्याच अशा या उन्नत मार्गाच्या माध्यमातून स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) लगतच्या समुद्राचे सौंदर्यही पाहता येणार आहे.
हा प्रकल्प महानगरपालिकेच्या डी विभाग अंतर्गत फिरोजशहा मेहता उद्यान आणि कमला नेहरू उद्यान याठिकाणी जल अभियंता विभागामार्फत विकसित करण्यात आला आहे. निसर्ग उन्नत मार्गाची लांबी एकूण ४८५ मीटर आणि रूंदी २.४ मीटर इतकी आहे. या मार्गावर एका ठिकाणी समुद्राचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी सी व्हिविंग डेक देखील बांधण्यात आला आहे.
या प्रकल्प अंतर्गत लाकडी फलाटाच्या उन्नत मार्गावर चालण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. लाकडी कठडा (रेलिंग), दुतर्फा आधार देणारे खांब आणि लाकडी जोडणी सांधे अशा पद्धतीची रचना या मार्गावर करण्यात आली आहे. भक्कम पायाभरणीसह (पाईल फाऊंडेशन) पोलादी जोडणीचा आधारही या बांधकामाला देण्यात आला आहे. त्यासमवेत, आकर्षक अशा स्वरूपाची प्रकाश व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यटकांच्या भेटीची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी एक्सेस कंट्रोल सिस्टिम (प्रवेश नियंत्रण प्रणाली) विकसित करण्यात आली आहे. प्रकल्प कक्षातून संपूर्ण उन्नत मार्गावर देखरेख ठेवणे तसेच भेट देणाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. एवढेच नव्हे तर आपत्कालीन मार्गाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.






