महाराष्ट्रमुंबई

महिलांच्या आरोग्यासाठी शासनाचा सकारात्मक दृष्टिकोन – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई : महिलांच्या आरोग्याचा प्रश्न महत्वाचा आहे. कौटुंबिक जबाबदारी सांभाळत नोकरी करताना महिलांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. यासाठी महिलांचे शारिरीक आणि मानसिक आरोग्य सदृढ असले पाहिजे. यासाठी शासन विविध सुविधा देण्यास सकारात्मक असून महिलांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी शासन सदैव प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघांतर्गत दुर्गा महिला मंचच्यावतीने मंत्रालय येथील परिषद सभागृहात महिला दिन या कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री श्रीमती तटकरे बोलत होत्या. यावेळी दुर्गा महिला मंचच्या अध्यक्षा सिद्धी संकपाळ, उपाध्यक्षा सुवर्णा जोशी-खंडेलवाल , कोषाध्यक्षा विशाखा आढाव, सरचिटणीस सरोज जगताप, मुख्य सल्लागार ग. दी. कुलथे व राज्य कर्मचारी अधिकारी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की,  नोकरदार महिलांचे आरोग्य उत्तम रहावे यासाठी ३० वर्षांनंतर नियमित आरोग्य तपासणी, विपश्यना शिबिरे, स्वच्छ विश्रांतीगृहे आणि स्वच्छतागृहांसारख्या सोयीसुविधांची अंमलबजावणी शासनामार्फत करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.  महिलांच्या मूलभूत गरजा, अधिकार, समजातील समान स्थान या विषयांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. शासनाने मुलाच्या नावापुढे आईचे नाव लावलण्याचा निर्णय घेतल्याने वडिलांसह आई सुद्धा तेवढीच महत्वाची आहे, हा सकारात्मक विचार पुढील पिढीत रुजवण्यासाठी  मदत होणार आहे. व्यवसाय किंवा नोकरी करणारी महिला दुहेरी भूमिका बजावत असते. प्रत्येक महिलेने जसे आई होणे महत्वाचे आहे तसेच त्याकाळात तिचे शारीरिक व मानसिक आरोग्य  सांभाळणे ही तितकेच महत्वाचे आहे. त्यामुळे राज्य शासकीय कर्मचारी महिलांची बालसंगोपन रजा वाढविण्यासंदर्भात सकारात्मक विचार करण्यात येईल,  असेही मंत्री श्रीमती तटकरे यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमात महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे २ वर्षांची बालसंगोपन रजा, सर्व कार्यालयांत ‘अंतर्गत तक्रार समित्या गठीत करुन शासनस्तरावरुन त्रैमासिक आढावा, सर्व शासकीय कार्यालयांमध्ये महिलांसाठी स्वच्छ व नीटनेटकी स्वतंत्र स्वच्छतागृहे तसेच विश्रांती व हिरकणी कक्षाची सुविधा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये महिला आवश्यक सुविधा,  ज्या आस्थापनेत संध्याकाळनंतर उशीरापर्यंत महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांना काम करावे लागते तेथे सुरक्षा रक्षक असावेत. तसेच नेण्या-आणण्याची व्यवस्था असावी, आदी जिव्हाळ्याच्या विषयांवर व विविध मागण्यांवर शासनस्तरावर चर्चा  करण्यात येणार असल्याचेही मंत्री श्रीमती तटकरे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!