महाराष्ट्र

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंच्या निवासस्थानाचे वीजेचे बिल लाखोंच्या घरात,वाचा सविस्तर बातमी

मुंबई- मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु यांच्या कालिना येथील निवासस्थानाचे वीज बिल लाखोंच्या घरात येत असून मागील ११ वर्षात एकूण २५ लाख २५ हजार २७२ रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुंबई विद्यापीठाने दिली आहे.

तर एकूण बिलाच्या निम्म्याहून अधिक बिल हे विद्यमान कुलगुरु डॉ.सुहास पेडणेकर यांचे असून मागील ४ वर्षाचे त्यांनी १३ लाखांची वीज त्यांनी वापरली आहे. मागील ३ कुलगुरुच्या तुलनेत वीज बिल वापरात डॉ सुहास पेडणेकर यांची आघाडी आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु यांच्या निवासस्थानी वापरण्यात आलेल्या विजेच्या बिलाची आणि अन्य माहिती विचारली होती. मुंबई विद्यापीठाने अनिल गलगली यांस वर्ष २०११ पासून २०२१ या ११ वर्षातील वीज बिलाची आकडेवारी दिली.

मागील ११ वर्षात २५ लाख २५ हजार २७२ रुपये वीज बिलावर खर्च झाले आहेत. या ११ वर्षात डॉ राजन वेळूकर, डॉ संजय देशमुख आणि डॉ सुहास पेडणेकर असे ३ कुलगुरु मुंबई विद्यापीठास लाभले. डॉ वेळूकर आणि डॉ देशमुख यांच्या ७ वर्षाच्या कार्यकाळात जितक्या रक्कमेची वीज वापरली गेली, त्याहून अधिक रक्कमेची वीज मागील ४ वर्षात डॉ सुहास पेडणेकर हे वापरत आहेत. 

डॉ वेळूकर आणि डॉ देशमुख यांच्या कारकिर्दीत वर्ष २०११ मध्ये १.५१ लाख, वर्ष २०१२ मध्ये १.५४ लाख, वर्ष २०१३ मध्ये १.८२ लाख, वर्ष २०१४ मध्ये २.४२ लाख, वर्ष २०१५ मध्ये १.७१ लाख, वर्ष २०१६ मध्ये १२.६६ लाख तर वर्ष २०१७ मध्ये १.८९ लाख अशी रक्कम अदा करण्यात आली आहे.

तर डॉ सुहास पेडणेकर यांनी सर्व विक्रम मोडले आहेत. वर्ष २०१८ मध्ये ३.३९ लाख, वर्ष २०१९ मध्ये २.२२ लाख, वर्ष २०२० मध्ये ५.५५ लाख आणि वर्ष २०२१ मध्ये १.८९ लाख रुपयांची वीज वापरली आहे. डॉ.सुहास पेडणेकर यांनी फक्त ४ वर्षात १३ लाखांची वीज वापरली आहे. तर डॉ वेळूकर आणि डॉ.देशमुख यांनी ७ वर्षात १२ लाखांची वीज वापरली आहे.

अनिल गलगली यांच्या मते निवासस्थान आणि सुविधा जरी दिल्या असल्या तरी वीज जपून वापरली जाणे अपेक्षित आहे. पगाराच्या तुलनेत सुविधांवर खर्च अधिक होत असून यावर बंधन नसले किंवा असले तरी नैतिकतेच्या दृष्टीकोनातून अश्या सुविधांचा वापर काटकसरीने करणे योग्य राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!