कोंकणमुंबईराजकीय

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मेट्रो 3 चे लोकार्पण संपन्न !

नवी मुंबई: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पार पडले. तसेच मोदींच्या हस्ते मुंबईतील पहिली पूर्णपणे भूमिगत असलेली मेट्रो एक्वा लाईन-३ च्या अंतिम टप्प्याचे देखील उद्घाटन झाले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंगलप्रभात लोढा आणि इतर अनेक नेते उपस्थित होते.

याप्रसंगी मोदी म्हणाले की, मुंबईला आज, दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळाले आहे. हे केवळ विमानतळ नसून विकसित भारताची झलक दाखवणारे प्रवेशद्वार आहे. यामुळे मुंबई लवकरच देशातील सर्वात मोठं कनेक्टिव्हिटी हब बनेल. हे विमानतळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवर कमळाच्या आकारात बांधले गेले असून, ते भारतीय संस्कृती आणि समृद्धीचे प्रतीक असल्याचे मोदी म्हणाले. यापूर्वी २०१४ पर्यंत देशात फक्त ७४ विमानतळ होते, मात्र आज त्यांची संख्या १६० वर पोहोचली आहे. आमच्या सरकारने ‘उडाण योजना’ सुरू करून सामान्य माणसालाही हवाई प्रवास परवडण्यासारखा केला. छोट्या शहरांनाही हवाई मार्गाने जोडण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे मोदींनी सांगितले.

पंतप्रधान मोदींनी यावेळी मविआ सरकारवर निशाणा साधताना म्हटलं, “मविआ सरकारच्या धोरणांमुळे देशाचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. योग्य नियोजन आणि दूरदृष्टी नसल्यामुळे प्रकल्प थांबले, निधी अडवला गेला आणि लोकांना लाभ मिळण्यास विलंब झाला. महाराष्ट्र सरकारने आज अनेक औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम सुरू केले आहेत. यामध्ये इलेक्ट्रिक वाहने, सोलर एनर्जी, ग्रीन हायड्रोजन अशा भविष्यातील महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे.पंतप्रधानांनी स्वर्गीय दि. बा. पाटील यांच्या कार्याचा गौरव करताना ते प्रेरणादायी असल्याचेही नमूद केले.

अलिकडेच, एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने आणि माजी गृहमंत्र्यांनी खुलासा केला आहे की, मुंबईत २००८ मधील हल्ल्यानंतर आमचे सुरक्षा दल पाकिस्तानवर हल्ला करण्यास तयार होते, परंतु दुसऱ्या देशाच्या दबावामुळे, त्यावेळच्या काँग्रेस सरकारने आमच्या सुरक्षा दलांना थांबवले. काँग्रेसने हे सांगायला हवे की परदेशी शक्तीच्या दबावाखाली हा निर्णय कोणी घेतला ? काँग्रेसच्या कमकुवतपणामुळे दहशतवाद्यांना बळकटी मिळाली. आमच्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा आणि आमच्या नागरिकांच्या सुरक्षिततेपेक्षा काहीही महत्त्वाचे नाही, असेही पंतप्रधान मोदी यांनी स्‍पष्‍ट केले. सध्‍याचा भारत हा घरात घुसून मारणारा आहे. नुकतेच भारताने राबवले ऑपरेशन सिंदूर त्‍याचे उदाहरण असल्‍याचेही त्यांनी सांगितले.

मेट्रो, रस्ते, जलसेवा विमानतळाला जोडणं हाच केंद्रबिंदू – पंतप्रधान

आज मुंबईचे दीर्घ प्रतीक्षित स्वप्न साकार झाले. विमानतळाला एशियातील एक महत्त्वाचा कनेक्टिव्हिटी हब बनवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून ट्रान्सपोर्टची सर्व माध्यमं मेट्रो, रस्ते, जलसेवा विमानतळाला जोडणं हाच याचा केंद्रबिंदू आहे आणि हे एक मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटीचे उदाहरण ठरेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या विकासाच्या स्वप्नाला नव्या गतीने पंख देणारा एक महत्त्वाचा टप्पा पार केल्याचे सांगितले. यावेळी मोदींनी भाषणात केंद्र, राज्य व खाजगी भागीदारीने केलेल्या व्यवस्थापनावर आनंद व्यक्त केला.

मोदींनी खास करून युवकांना संदेश दिला की, हा काळ तुमच्यासाठी आहे, अशा संधी तुम्ही हाताळाव्यात. महाराष्ट्रातील आयटीआय आणि तांत्रिक संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. ज्याद्वारे विद्यार्थी आधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्य शिकण्यास सक्षम होतील. यावेळी ते लोकनेते दि.बा. पाटील यांच्या कार्याचा स्मरण करून त्यांच्या प्रेरणादायी कार्याची आठवण केली.

विमानतळासाठी लागणारी खर्च संकल्पना, सुविधा आणि तंत्रज्ञानावर मोदी यांनी भर दिला. प्रथम टप्प्यातील १९,६५० कोटींच्या गुंतवणुकीचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, हे विमानतळ जागतिक दर्जाचे असेल. उद्घाटनसोबतच मुंबई मेट्रो लाइन-3 चा अखेरचा टप्पाही मोदी यांनी सुरू केला, तसेच पहिले एकात्मिक मोबिलिटी अ‍ॅप ‘मुंबई वन’चे अनावरण केले. तसेच स्वदेशीचा वापर केला पाहिजे असे म्हणाले. मोदींच्या मते, विकसित भारताचं स्वप्न हे या विमानतळात परावर्तित आहे. त्यांनी या प्रकल्पातील संधींचा उपयोग रोजगार निर्मितीसाठी होण्याची अपेक्षा व्यक्त केली आणि स्थानिक युवकांना अधिकाधिक संधी मिळाव्यात, असे आवाहन केले.

विमानतळामुळे राज्‍याचा जीडीपी वाढणार :मुख्यमंत्री
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आम्ही वर्षानुवर्षे हे विमानतळ होणार असं ऐकायचो. मोदींजींकडे बैठक घेतली आणि १५ दिवसांत विमानतळाच्या कामाला मंजुरी मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देशात सरकार आल्यानंतर नवी मुंबई विमानतळाच्या कामाला वेग आला. केवळ काही तासांमध्ये दहा वर्ष झाले नव्हते, ते पंतप्रधान मोदी यांच्या बैठकीनंतर झाले. आजचा दिवस स्वप्नपूर्तेचा आहे. या विमानतळामुळे राज्याचा जीडीपी एक टक्क्याने वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांचा जिथे हात लागतो तिथे सोनं होतं: एकनाथ शिंदे
आठ वर्षांपूर्वी सर्वात मोठ्या एअर पोर्टचे भूमिपूजन मोदींच्या हस्ते झाले होते. आज याचे उद्घाटन होत आहे. ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात लागतो, तिथे सोने होते. नवीन भारताचा संकल्प हा मोदींच्या विश्वासाचे प्रतीक आहे. २१ व्या शतकात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे स्थान असेल. आता मुंबईची तुला नवी मुंबईशी केली जाईल हा प्रकल्प एक उत्तम उदाहरण आहे. हे विकासकाम केवळ आणि केवळ महायुती सरकारच करू शकते. मेट्रो, नवी मुंबई एअर पोर्ट आणला पण काहींनी मधल्या काळात स्पीड ब्रेकर लावला; पण आमचं सरकार आलं आणि काम सुसाट झालं. आज आमचा शेतकरी संकटात आहे. आम्ही पॅकेज जाहीर केलं आहे. जो शब्द आम्ही दिला होता, तो पाळला आहे, असेही त्यांनी सांगितले.

संकट काळात पंतप्रधान महाराष्ट्राला साथ देतील: अजित पवार
यावेळी अजित पवार म्हणाले की, आजचा दिवस केवळ मुंबईच नाही तर महाराष्ट्रासाठी मोठा आहे. नवी मुंबई विमानतळाच्या उभारणीचा प्रवास इतका सोपा नव्हता. तो आता पूर्ण झाला आहे. राज्यात सध्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. संकटाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राला साथ देतील. संकटाच्या काळात ते नेहमी महाराष्ट्राला साथ देतात असे त्यांनी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!