एसटीच्या कर्मचाऱ्यांचा संप अखेर मिटला,संप मागे घेण्याचा कर्मचारी संघटनेचा निर्णय

मुंबई:– राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या कर्मचाऱ्यांचा संप अखेर मिटला आहे. मुंबई हायकोर्टात झालेल्या आजच्या सुनावणीनंतर एसटीच्या कर्मचारी संघटनेनं संप मागे घेण्याचा निर्णय घेतलापरिवहनमंत्री अनिल परब यांच्यासह महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर, सरचिटणीस शेषराव ढोणे संयुक्त पत्रकार परिषद घेत संप मागे घेतल्याची घोषणा केली.
अजय गुजर म्हणाले, 21 ऑक्टोबर २०२१ नुसार, ४ नोव्हेंबर पासून पुकारलेल्या संपाला आज ४५ दिवस झाले आहेत. गेल्या ४५ दिवसांत शांततेत पार पडला. दरम्यान, परिवन मंत्र्यांसोबत आमच्या दोन-तीन वेळेस चर्चा झाल्या. त्यानंतर काल शरद पवार यांच्यासोबत दिल्लीत आमची प्रदीर्घ चर्चा झाली. त्यांनी विलिनिकरणाबाबत जो निर्णय होईल तो मान्य करण्याचं ठरवलं. राज्य शासनामध्ये विलिनीकरणावर आम्ही आजही ठाम आहोत. पण हा निर्णय आता कोर्टात प्रलंबित असल्यानं आणि कोर्टानं यासाठी १२ आठवड्यांचा अवधी दिल्यानंतर २० जानेवारी पर्यंतचा हा काळ आहे. त्यातच आज हायकोर्टात समितीचा प्राथमिक अहवाल सादर झाला. यावर दिवसभर आमच्या चर्चा झाल्या यामध्ये कोर्टाचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल.
यापुढे ज्या ५४ कर्माचऱ्यांनी आत्महत्या केल्या त्या कर्मचाऱ्यांचा आम्ही प्रशासनासह विचार करु. त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख रुपये आणि कुटुंबातील एका व्यक्तीला तात्काळ नोकरीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर करोना काळात ज्यांचे मृत्यू झाले त्यांच्या कुटुंबियांनाही मदत देण्यात येणार आहे.