तज्ज्ञांनी मुख्यमंत्र्यांना केले सतर्क, जानेवारी महिन्यात महाराष्ट्रभर पसरणार ओमायक्रॉन?

मुंबई – काही दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत आल्याचं चित्र दिसून येत होत. मात्र, आता दुसरीकडे पुन्हा एकदा हे चित्र बदलताना दिसत आहे. कोरोना व्हायरसचे रुग्ण पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. कोरोना व्हायरसचा नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटनं शिरकाव केल्यानं जगभरात चिंतेचं वातावरण आहे.
या पार्श्वभूमीवर आरोग्य प्रशासन सतर्क झालं आहे. भारतात या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून येत आहे. दिवसेंदिवस या रुग्णांची संख्या देशात वाढत चालली आहे. त्यातही मागच्या वेळेसारखे या कोरोना व्हेरिएंटचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. त्यामुळे राज्य सरकारची चिंता वाढली आहे. आता यासंदर्भातली महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जानेवारी महिन्यात महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात ओमायक्रॉनची प्रकरणे आढळून येण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे.
तज्ज्ञांनी राज्य मंत्रिमंडळाला यासंदर्भातली माहिती दिल्याचं समजतंय. दरम्यान जानेवारी महिन्यात आढळून येणारे हे रुग्ण केवळ मोठ्या शहरांतील नसून लहान शहरांतीलही असतील, असंही तज्ज्ञांनी सांगितलं आहे. त्यातच दोन्ही डोस लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी लसीकरण मोहीम हाती घेण्याचं निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य प्रशासनाला दिले आहेत.