महाराष्ट्रमुंबई

ठाकरे बंधूचं युतीसाठी एक पाऊल पुढे, आदेशही सुटले !

२ फॉर्म्युल्यांवर चर्चा!! कोणाला किती जागा?

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना उबाठा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती होण्याची दाट शक्यता आहे. याबद्दलची अधिकृत घोषणा दिवाळीत होऊ शकते. मुंबईत समसमान आणि उपनगरांमध्ये ६०-४० च्या फॉर्म्युल्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकांसाठी स्वतंत्र फॉर्म्युला असणार आहे. मुंबई महापालिका निवडणूक दोन्ही ठाकरेंसाठी प्रतिष्ठेची आहे. या निवडणुकीत ठाकरे ब्रँडची परीक्षा असेल.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आपापल्या पक्षाच्या नेत्यांना मुंबईतील जागांची यादी करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईत पालिकेचे एकूण २२७ प्रभाग आहेत. पैकी १४७ जागांवर उद्धवसेनेनं दावा केला आहे. मनसेला ८० जागा सोडण्याची तयारी शिवसेनेनं उबाठानं दाखवली आहे. पण मनसेनं ९५ जागांचा आग्रह धरला आहे. मागील निवडणुकीत मनसेच्या ७ जागा निवडून आल्या होत्या. ही निवडणूक २०१७ मध्ये झाली होती. त्याआधी २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत मनसेचे २८ उमेदवार विजयी झाले होते. हीच मनसेची मुंबई महापालिका निवडणुकीतील सर्वोच्च कामगिरी आहे.

मुंबईत उद्धवसेनेचे ३ खासदार आणि १० आमदार आहेत. २०१७ मध्ये शिवसेना आणि भाजप यांनी स्वबळावर निवडणूक लढवली. त्यावेळी शिवसेनेच्या ८४, तर भाजपच्या ८२ जागा निवडून आल्या होत्या. २०२२ मध्ये शिवसेनेत बंड झालं. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात ४० आमदारांनी ठाकरेंची साथ सोडली. तेव्हापासून आतापर्यंत निम्म्या माजी नगरसेवकांनी शिंदेसेनेत प्रवेश केलेला आहे. त्यामुळे मुंबईतील ठाकरेंची ताकद घटली आहे. मात्र गेल्या निवडणुकीत जिंकलेल्या बहुतांश जागांवर उद्धव ठाकरेंनी त्यांचा दावा कायम ठेवला आहे.
काही प्रभागांमध्ये मनसेचा प्रभाव असून त्या जागांविषयी चर्चा सुरु आहे. दादर-माहीम, परळ, विक्रोळी, दिंडोशी, घाटकोपर, भांडूप, दहिसर अशा विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना उबाठा आणि मनसेची ताकद आहे. या मतदारसंघांमधील प्रभागांची समान वाटणी होईल. तर उर्वरित ठिकाणी एकमेकांच्या ताकदीच्या आधारे निर्णय घेतला जाईल, अशी सुत्रांची माहिती आहे. विधानसभेच्या एका मतदारसंघात पालिकेचे ६ प्रभाग असतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!