अंतराळवीरांना अंतराळातच, ‘नासा’चे ‘स्टारलायनर’ पृथ्वीवर परतले

वॉशिंग्टन – अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाचे स्टारलायनर यान शुक्रवारी रात्री पृथ्वीवर परतले. या यानातून भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बूच विल्मोर पृथ्वीवर परतणे अपेक्षित होते. मात्र यानात बिघाड झाल्याने दोन्ही अंतराळवीर अद्याप आंतरराष्ट्रीय अवकाश तळावर अडकून पडले आहेत. त्यामुळे अंतराळवीरांना अंतराळातच ठेवून ‘नासा’चे ‘स्टारलायनर’ पृथ्वीवर परतले आहे. अवकाश तळावरून वेगळे होऊन पृथ्वीच्या दिशेने निघालेले स्टारलायनर यान सहा तासांच्या प्रवासानंतर पॅराशूटच्या साह्याने रात्रीच्या मिट्ट काळोखात न्यू मेक्सिकोतील व्हाईट सँड क्षेपणास्त्र चाचणी केंद्रावर उतरले. नासाने महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत विल्यम्स आणि विल्मोर यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठविले होते. ५ जून रोजी स्टारलायनर यान अंतराळवीरांना घेऊन अवकाश तळावर गेले होते. ही मोहीम अवघ्या एका आठवड्याची होती. मात्र यानात हेलियमची गळती आणि थ्रस्टर्समध्ये बिघाड झाल्याने अंतराळवीरांना पृथ्वीवर आणणे धोक्याचे असल्याने नासाने अंतराळवीरांना अंतराळातच ठेवून यान पृथ्वीवर आणण्यात आले. आता पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यापर्यंत अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातच राहावे लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!