गैरमार्गाने ठाण्याच्या महापौरांसह इंडिया बुलच्या कर्मचाऱ्यांनी घेतली कोरोनाची लस!
भाजपा नेते आमदार ॲड.आशिष शेलार यांची विधानसभेत माहिती
मुंबई, दि. 3: देशाचे पंतप्रधान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी निक्षून सांगितले होते की, फ्रंटलाईन वर्कर्सना प्रथम लस देण्यात येईल असे असताना ठाण्याचे महपौर, एक शिवसेना आमदार आणि वरळीतील इंडिया बुलच्या कर्मचाऱ्यांनी कोविड लस घेतली, अशी माहिती देऊन विधानसभेत भाजपा आमदार अँड आशिष शेलार यांनी माझे सरकार म्हणून मग सरकारला माझे कसे म्हणायचे? असा सवाल केला.
महाराष्ट्रा सरकार हे आपले सरकार आहे असे प्रचार करते पण शासनाची चार खाती मंत्री किंवा अधिकारी नाही पण वेगळीच माणसे चालवत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशांत निलांंबरी, उद्योग विभाग गिरीश पवार, नगर विकास विभाग अजय आशर, गृहनिर्माण विभाग किर्तीकुमार केडिया हे चालवत आहेत. या व्यक्ती कोण आहेत?. तर उच्च शिक्षण मंत्री यांच्याकडे 15 ते 20 कर्मचारी कर्जाऊ घेण्यात आले आहेत. मग जर शासनाची 4 खाती बाहेरच्या व्यक्ती चालवतात एका खात्यात कर्मचारी कर्जाऊ आहेत तर एमएमआरडीए सारख्या महत्त्वाच्या प्राधिकरणावर आर . ए. राजिव यांना कंत्राटी पध्दतीने घेण्यात येणार आहे. मग हे सरकार आपले सरकार कसे? असा सवाल त्यांनी केला.
कोरोना काळात सरकारने जे काम केले त्यावरन सरकार आपली पाट थोपटून घेतात पण या काळात खाजगी रुग्णालयांनी कसे लुटले याची उदाहरणे देऊन आमदार आशिष शेलार यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
तसेच नुकतेच कमला मिल मधील पब मध्ये रात्री उशिरापर्यंत कोरोनाचे नियम न पाळता गर्दी केल्याचे व्हिडीओ समोर आले होते. अशांचे धाडस का होते? याच कमला मिलमध्ये 29 डिसेंबर 2017 रोजी लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी 15 जणांवर गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी रमेश गोवानी आणि रवी भंडारी या 2 मिल मालकांनी न्यायालयात जाऊन दोष मुक्त करुन घेतले. त्या विरोधात सरकारने अपिल करावे अशी मागणी आम्ही केली. पण अद्याप या प्रकरणी सरकारने अपिल का केले नाही? यातूनच काही प्रवृत्ती वाढतात असे सांगत आमदार अँड आशिष शेलार यांनी सरकारचे नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा, अशी मागणी केली. मेट्रोची कारशेड आरे मधून कांजूर मार्गला आण्याचा हट्ट केला जातोय पण यात काही जमीन मालकांच्या फायद्यासाठी करीत तर नाही ना? असे आम्ही वारंवार सांगत होतो. नुकतेच न्यायालयात सरकारने मालकांना नुकसान भरपाई देऊ असे सांगते आहे. हेच आम्ही सांगत होतो असे सांगून आमदार अँड आशिष शेलार यांनी कांजूर मार्ग प्रकरणी सरकारच्या हेतू बाबतच शंका उपस्थित केली.
दरम्यान, मुंबई महापालिकेच्या जी दक्षिण विभागात फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांच्या यादीमध्ये बोगस नावे घुसवून इंडिया बुलच्या कर्मचाऱ्यांनी लस घेतली. या प्रकरणी पालिका अतिरिक्त आयुक्त कंकाणी यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश ही दिले आहेत, अशी माहिती आपल्या राज्यापालांच्या अभिभाषणावरील चर्चेत दिली.