कोंकणमहाराष्ट्रमुंबईराजकीय

सरकारने जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी, महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले: हर्षवर्धन सपकाळ

पनवेलमध्ये 'कामगार मेळावा आणि संविधानाचा जागर २०२५' कार्यक्रम संपन्न.

अदानीला घाबरून पंतप्रधानांनी नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचे नाव देणे टाळले, विमानतळ उद्घाटनानंतर नुकसानग्रस्त भागाची हवाई पाहणी तरी करणार का?

मुंबई : अतिवृष्टी व पुराने राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे, खरीप हंगाम तर पूर्ण वाया गेलाच आहे पण रब्बीचा हंगामही हाती लागणार नाही अशी अवस्था आहे. शेतीच्या नुकसानासोबत शेतकऱ्यांचे घर दार संसार उघड्यावर पडले आहेत परंतु भाजपा महायुती सरकारने मात्र नुकसानभरपाईच्या नावाने फसवणूक केली आहे. लाखोंचे नुकसान झाले असताना सरकारने जाहीर केलेली मदत ही अत्यंत तुटपुंजी असून उद्ध्वस्थ झालेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, अशी टीका करून सरकारने सरसकट नुकसानग्रस्त शेतक-यांना प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी व आश्वासन पाळून कर्जमाफी करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्त्वाखाली आज पनवेल येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापर्यंत संविधान संवाद यात्रा काढण्यात आली. त्यानंतर पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे आयोजित ‘कामगार मेळावा आणि संविधानाचा जागर २०२५’ या कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रामचंद्र आबा दळवी, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, पनवेल काँग्रेसचे प्रभारी व वरिष्ठ प्रवक्ते गोपाल तिवारी, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य आर. सी. घरत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव श्रुती म्हात्रे, पनवेल शहर जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, पनवेल शहर युवक जिल्हाध्यक्ष हेमराज म्हात्रे, मा. नगरसेवक हरेश केणी, पनवेल अर्बन बँक संचालक जनार्दन पाटील, शाहीर संभाजी भगत तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, राज्यातील ३० जिल्ह्यातील जवळपास ३०० तालुक्यात अतिवृष्टी व महापूराने थौमान घातले आहे. सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी ५ लाख रुपये व कर्जमाफी करावी अशी मागणी केलेली असताना सरकारने मात्र शेतकऱ्यांना वाटाण्याचा अक्षता लावल्या आहेत. अदानी अंबानींच्या फाईलवर कसलाही विचार न करता तात्काळ सह्या करणारे शेतकऱ्यांना भरीव मदत देताना मात्र त्यांच्या हाताला कंप मारतो काय?, असा संतप्त सवाल सपकाळ करून हे सरकार शेतकरी व गोरगरिब जनतेचे नसून फक्त मुठभर धनदांडग्यांसाठी आहे हे पुन्हा दिसून आले आहे असे ते म्हणाले.

पंतप्रधान नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार का..
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावर येत असून नवी मुंबई विमानतळाचे ते उद्घाटन करणार आहेत. या विमानतळाला ज्येष्ठ नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली जात आहे पण सरकारने अद्याप नाव दिले नाही. अदानीला घाबरून दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास टाळाटाळ केली जात आहे. तर महाराष्ट्रावर अस्मानी संकट कोसळले असताना देशाच्या पंतप्रधानांना त्याचे काहीच सोयरसुतक नाही, नुकसानग्रस्त भागाची हवाई पाहणी तरी ते करतील काय?, असा सवाल करून केवळ श्रेय घेण्याच्या कामासाठीच पंतप्रधान पुढे येतात पण संकटातील लोकांसाठी येत नाहीत, असेही सपकाळ म्हणाले.

राहुल गांधींबद्दलचे शब्द अयोग्य…
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, मनोज जरांगे यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल वापरलेले शब्द अयोग्य आहेत. राहुल गांधी यांनी आरक्षणाचा प्रश्न सुटावा यासाठीच जातनिहाय जनगणना व ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी अशी आग्रही मागणी केलेली आहे. काँग्रेस पक्षानेच सर्वात पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण दिले होते. आताही सर्वच राजकीय पक्षांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे. पण निवडणुकीच्या तोंडावरच आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर येतो कसा? असा प्रश्नही सपकाळ यांनी उपस्थित केला आहे. याच कार्यक्रमात विविध क्षेत्रात उत्कृष्ठ काम करणा-या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. तसेच पनवेल शहरातील विविध पक्षातील नेते व पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!