बांधकाम विभागाला झालाय ‘भस्म्या’

शाम देऊलकर- मुंबई
गेल्याच आठवड्यात मुंबई-गोवा महामार्गाच्या स्थितीवरून शिवसेना नेते रामदास कदम व बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांमध्ये वाकयुद्ध रंगले होते. बांधकाम मंत्र्यांनी कदमांना थेट थोबाड फोडायचे ‘जशास तसे’ प्रत्युत्तर दिले होते. मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न आता अख्ख्या राज्यालाच माहीत झाला आहे.
सालाबादच्या गणेशोत्सवाप्रमाणे गोवा महामार्गाची चिक्तित्साही प्रत्येक वर्षी साधारणपणे श्रावणात होत असते. यावेळी (निवडणुकीचे वर्ष असल्याने) तर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या हायवेची पाहणी केली. पण आज खऱ्या अर्थाने बांधकाम विभागाचे धिंडवडे निघाले. (तसे ते कधीचेच निघाले आहेत.) आज तर कहरच झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणातील पुतळा कोसळल्याने आज राज्यासह देशभरात खळबळ उडाली. विशेष म्हणजे या पुतळ्याचे उदघाटन अवघ्या आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान मोदींनी केले होते. महाराज आपल्या तेजस्वी आयुष्यात कधीही कोसळले नाहीत. पण त्या काळातही आणि आजही स्वकीयांनीच त्यांचा घात केला. महाराजांनी महासागराला आव्हान देत ‘सिंधुदुर्ग’ उभा केला.
प्रलंयकारी लाटा झेलू शकेल अशी तटबंदी त्याकाळात बांधली. अशा स्वराज्यनिर्मात्या शिवाजी महाराजांचाच पुतळा कोसळावा, याहून मोठे दुर्दैव कोणते असू शकते? साडेतीनशे वर्षांपूर्वी महाराजांनी उभारलेले गडकोट ढासळत नाहीत आणि त्यांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यांत कोसळावा, हे क्लेषदायक आणि संतापजनक आहे.
लोकसभा निवडणुकीच्या ऐन धामधुमीत अत्यंत घिसाडघाईने या शिवपुतळ्याचे अनावरण करण्यात आले. अरबी समुद्रात शिवस्मारक उभे करण्याच्या वल्गना करणाऱ्यांना त्यांचा भक्कम पुतळा उभारता येऊ नये, ही मोठी शोकांतिका आहे. स्वराज्याचा पाया घालणाऱ्या शिवरायांचा पुतळा कोसळल्याने महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली, ही वस्तुस्थिती आहे.
महाराजांचा पुतळा कोसळवण्याचे महापातकी काम या विभागाकडून घडल्याने आतातरी या विभागाचे ‘पोस्टमार्टम’ शासनकर्ते करणार आहेत की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. माध्यमकर्मी म्हणून काम करत असताना अलिकडे एखाद्या ‘मॅनहोल’मध्ये काम करणाऱ्या सफाई कामगारासारखी मनस्थिती व्हायला लागलीय. राज्यकर्ते व प्रशासकीय अधिकाऱ्यांची भ्रष्टाचारात आणि पैसे खाण्यात तीव्र स्पर्धा सुरु आहे. भ्रष्टाचार तर आधीपासूनच होता. पण अलिकडे त्याचे प्रमाण प्रचंड वाढलंय. सार्वजनिक बांधकाम विभाग, परिवहन (आरटीओ) विभाग आणि महसूल या विभागांमध्ये पैसे खाण्याची जणू चढाओढच लागली आहे. यात बांधकाम विभागाने तर परिसीमा गाठली आहे. वानगीदाखल सांगायचे झाले तर, मंत्र्यांच्या बंगल्यांची डागडुजीची कामे करूनही बंगले गळत आहेत. गेल्या महिन्यात तर विरोधी पक्षनेत्यांच्या बंगल्यात गळतीसाठी बादली लावावी लागली होती.
मुनगंटीवारांसारख्या ज्येष्ठ मंत्र्यानेही बंगल्याच्या दुरुस्तीबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली होती. राज्याच्या ज्येष्ठ लोकप्रतिनिधींची ही अवस्था तर सामान्य माणसांची काय दैना असेल याचा विचार आपण न केलेला बरा. बऱ्याच ठिकाणी तर कामे प्रत्यक्षात होतच नाहीत, ती कागदावरच होतात. यात अर्थात सगळेच सामील असतात. लोकप्रतिनिधींसकट सर्वांनाच त्यांचे त्यांचे वाटे दिले जातात. ‘बांधकाम’ विभागाच्या भ्रष्टाचाराचा ‘मनोरा’ म्हणजे मनोरा आमदार निवासाचे आणखी एक उदाहरण. 50 वर्षांपूर्वीचा आकाशवाणी आमदार निवास अजूनही व्यवस्थित उभा आहे आणि 1999 साली बांधलेला मनोरा आमदार निवास अवघ्या 20 वर्षांत पाडावा लागला. यावर कोणच काही बोलत नाही आणि बोललं गेलं तरी लक्ष दिलं जात नाही.
अधिवेशन कालावधीत स्लॅब पडल्यामुळे (का पाडल्यामुळे) घाईघाईने हा आमदार निवास पाडला गेला. त्या कामाची गुणवत्ता तपासणी झाली असती तर भल्याभल्यांची लक्तरं टांगली गेली असती असं म्हटलं जातं. ‘बांधकाम’च्या अशा बऱ्याच सुरस कहाण्या आहेत. राज्यभरातील काही मलईदार पदांसाठी खात्यांतर्गत बोली लागली जाते, असं समजतं. मुंबईतील बीडीडी चाळींच्या दुरुस्तीसारख्या कामातही अब्जावधींचा भ्रष्टाचार होतो. लोकप्रतिनिधी, पत्रकार व सामाजिक कार्यकर्तेही या प्रशासकीय गुंडांसमोर अक्षरशः हतबल होेतात, तिथे सामान्य माणसांची काय पत्रास लागणार आहे? ‘बांधकाम’च्या बांधकामी कामांची खऱ्या अर्थाने गुणवत्ता चाचणी (Quality control) केली तर त्या पैशांतून एक नवीन महाराष्ट्र उभा राहू शकतो, इतका हा महाभ्रष्टाचार आहे.
हा लेख लिहीत असताना बांधकाम विभागाने या प्रकरणातून आपले हात वर केले व पूर्ण जबाबदारी नौदलावर टाकली. हा टिपिकल सरकारी खाक्या आहे. प्रत्यक्ष पुतळा जरी नौदलाने आणला असला तरी या कामात बांधकाम विभागाचे ‘बांधकाम’ आहेच. आजच्या प्रकरणात शिल्पकार जयदीप आपटे आणि कंत्राटदार डॉ. चेतन पाटील या दोघांविरोधात मालवण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला असून सदरील गुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या फिर्यादीवरूनच नोंदवण्यात आल्याचेही समजते. आता कितीही सारवासारव केली तरी यानिमित्ताने ‘साबां’ची लक्तरे वेशीवर टांगली गेली, हे नाकारून चालणार नाही.