मोठी बातमी! कोरोनाबाधितांना खासगी रुग्णालयात भरती करण्यासाठी घ्यावी लागणार मुंबई महानगरपालिकेची परवानगी

मुंबई- कोरोना विषाणूने जगभर धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे.भारतातही कोरोनाने पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली आहे.अश्यात ओमायक्रॉननेही भारतात शिरकाव केला आहे. महाराष्ट्रात तर तिसऱ्या लाटेचे संकेत दिसू लागले आहेत. याच धर्तीवर मुंबई महानगरपालिकेने खासगी रुग्णालयांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे.
मुंबईतल्या खासगी रुग्णालयात भरती होण्यासाठी कोविड रुग्णांना आता मुंबई महापालिकेची परवानगी घ्यावी लागणार आहे. अशा सूचना मुंबई महापालिकेनं खासगी रुग्णालयांना दिल्या आहेत. कोरोनाची तिसरी लाट आल्यामुळे, बेडची कमतरता भासू नये यासाठी मुंबई महापालिकेनं पावलं उचलायला सुरुवात केली आहे. खासगी रुग्णालयांना ८० टक्के कोविड बेडची उपलब्धता ठेवण्यास सांगण्यात आले आहे. तसंच सरकारने निर्देशित केलेले दर आकारणं खासगी रुग्णालयांना बंधनकारक असणार आहे.
मुंबईत कोरोनाचा धोका वाढल्यानं महापालिका प्रशासन सज्ज झालं आहे. रुग्णांना वेळेवर उपचार मिळावे यासाठी दुसऱ्या लाटेप्रमाणेच पालिकेच्या परवानगीशिवाय खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णाला दाखल करू नका, अशा सक्त सूचना प्रशासनाने रुग्णालयांना दिल्या आहेत. यासाठी पालिकेने नुकतीच खासगी रुग्णालयांसाठी नियमावलीही जाहीर केली आहे. यासोबत बेड्स वाढवण्यासोबत रुग्णांसाठी आयसीयू वॉर्ड सज्ज ठेवा, अशा सूचनाही पालिकेने खासगी रुग्णालयांना दिल्या आहेत.