भाजपा आमदार नितेश राणेंना न्यायालयाने सुनावली ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

सिंधुदुर्ग:- शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे अडचणीत आले आहेत.काल नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी जामीनासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती.
मात्र, आज नितेश राणे यांनी उच्च न्यायालयातील जामीन अर्ज मागे घेत कणकवली दिवाणी न्यायालयाकडे शरणागती पत्करली आहे.दरम्यान शरणागती पत्करल्यानंतर कोर्टात यावर युक्तिवाद झाला. न्यायालयाने त्यांना येत्या ४ फेब्रुवारी पर्यंत म्हणजेच पुढील दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आमदार नितेश राणे आज कणकवली दिवाणी न्यायालयात सरेंडर झाले आहेत. तर कणकवली दिवाणी न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. यासंदर्भातील अधिकृत माहीती आमदार नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी दिली आहे.दरम्यान सरकार पक्षातर्फे नितेश राणे यांना दहा दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी केली गेली होती.
न्यायालयाने सुरुवातीला त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यावर पोलिसांनी आपल्या ताब्यात देण्याची मागणी न्यायालयात केली.यावर विचारविनिमय करून अखेर न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी नितेश राणे यांना सुनावली आहे.