कुरारगाव ते दिंडोशी बस डेपो हूमेरा पार्क येथील रस्ता सहा वर्षांच्या प्रदीर्घ पाठपुराव्यानंतर वाहतुकीसाठी खुला!
कुरारवासियांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
मुंबई : मुंबई पश्चिम उपनगरातील मालाड पूर्व दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील मोठा परिसर हा अविकसित आणि झोपडपट्ट्यांनी आच्छादलेला आहे. येथिल नागरी जीवनमान सुधारण्यासाठी या परिसरातील पायाभूत सुविधांचा विकास अग्रक्रमाने करणे गरजेचे आहे. या विभागातील सार्वजनिक जनहिताची महत्त्वाची विकासकामे करण्याकरिता शिवसेना नेते खासदार गजानन किर्तीकर यांच्या मार्गर्शनाखाली, मुख्य प्रतोद, आमदार, माजी महापौर मुंबई सुनिल प्रभु यांनी विविध संसदीय आयुधांचा वापर करून मागिल ६ वर्षापासून सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा केला. तसेच उपमहापौर सुहास वाडकर यांनी देखिल पाठपुरावा केला.
मालाड पूर्व कुरार गाव, हुमेरा पार्क येथील राणी सती मार्ग, मल्लिका हॉटेल ते दिंडोशी बस डेपो जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग यांना जोडणारा रस्ता हा पश्चिम द्रुतगती महामार्गाला समांतर रस्ता असून, या परिसरात होणारी वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या हुमेरा पार्क येथील रस्ता खुला करण्यासाठी आमदार सुनिल प्रभु यांनी पाठपुरावा केल्या नंतर पाहिल्या टप्प्यातील रस्त्याच्या विकासाने बाधित होणाऱ्या ८० घरांचे पुनर्वसन लगत असणाऱ्या एसआरएमध्ये करण्यास मंजुरी मिळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचने नुसार एसआरए मुख्य अधिकारी लोखंडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त पी वेलरासू, एसआरए सचिव रणजित ढाकणे यांनी समन्वयाने पाठपुरावा केला.
रस्ता विकसित झाला, त्या नंतर रस्त्याच्या पुढील टप्प्यात तेथे असणाऱ्या १६ निवासी घरे व ५ व्यावसायिक गाळे अशा एकूण २१ बांधकामांचे स्थलांतर करून प्रस्तावित विकास नियोजन रस्ता विकसित करणे आवश्यक असल्याने मुख्यमंत्री शासकीय निवास वर्षा बंगला या ठिकाणी झालेल्या बैठकीत माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व स्थानिक आमदार सुनिल प्रभु यांना आश्वासन दिल्या प्रमाणे महापालिका आयुक्त ईश्वर सिंह चहल यांनी हूमेरा पार्क येथील रस्त्याच्या विकासाने बाधित १६ पात्र निवासी सदनिकांचे पुनर्वसन लगत असलेल्या एसआरए प्रकल्पात व व्यावसायिक गाळ्यांचे स्थलांतर महापालिका मंडई व पर्यायी जागेत करून रस्ता मोकळा करण्याचे आदेश दिले.
त्या नुसार सहाय्यक महापालिका आयुक्त धोंडे, सहाय्यक अभियंता तारी, दुय्यम अभियंता मोहिते यांनी पात्र घरांचे स्थलांतर केले प्रत्यक्ष त्या ठिकाणी उभे राहून रस्ता मोकळा केला. हा विकास नियोजन रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्याने हुमेरा पार्क येथील होणारी वाहतूक कोंडी फुटली असून दिंडोशी विधानसभा क्षेत्रात पर्यायी रस्ता निर्माण झाला आहे. सध्या एसआरए प्रकल्पाच्या हद्दीतील रस्ता महापालिकेने ताब्यात घेऊन डांबरी रस्ता वाहतुकीसाठी खुला केला आहे.
यापुढील टप्प्यात हा रस्ता सिमेंट – काँक्रिट रस्ता करण्यात येणार असून कडेला दिवाबत्तीची सोय देखिल असणार आहे अशी माहिती आमदार सुनिल प्रभु यांनी दिली. आमदार सुनिल प्रभु यांच्या उपस्थितीत कोविड नियमांचे पालन करून विभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. यावेळी विधानसभा संघटक प्रशांत कदम, उपविभाग प्रमुख गणपत वारीसे, प्रदिप ठाकूर, शाखा प्रमुख सुभाष धनुका, रामचंद्र पवार, शाखा संघटक निशा कांबळे, कृतिका शिर्के, युवासेना मुंबई समन्वय समृद्ध शिर्के आणि स्थानिक उपस्थित होते.
आमदार सुनिल प्रभु यांची वचन पूर्ती
टाळेबंदी कालावधीत देखिल मुख्य प्रतोद, आमदार, विभाग प्रमुख, माजी महापौर मुंबई सुनिल प्रभु यांनी दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील पायाभूत विकास कामांचा वेग कायम राखला आहे. मालाड पूर्व कुरार गाव, हुमेरा पार्क येथील राणी सती मार्ग, मल्लिका हॉटेल ते दिंडोशी बस डेपो जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग यांना जोडणारा रस्ता हा पश्चिम द्रुतगती महामार्गाला समांतर रस्ता असून, या परिसरात होणारी वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या हुमेरा पार्क येथील रस्ता खुला करण्याचे वचन आमदार सुनिल प्रभु यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकी दरम्यान दिले होते.
त्यानुसार आमदार सुनिल प्रभु यांनी दिंडोशी वासियांना दिलेले अजुन एक वचन पूर्ण केले आहे. हा रस्ता मोकळा झाल्याने पठाणवाडी, संजय नगर, कुरार गाव येथील वाहनांना दिंडोशी डेपो, गोरेगावच्या दिशेने प्रवास करताना वळसा न घालता सरळ प्रवास करता येत आहे. पर्यायी रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्याने कुरार मधील वाहतूकोंडी कमी झाली आहे. याबद्दल स्थानिकांसह येथून वाहतूक करणारे प्रवासी मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त करत आहेत.