पाणीटंचाईला राज्य शासनासह पालिका जबाबदार
आमदार सुनील प्रभू यांचा आंदोलनाचा इशारा..

गोरेगाव : महेश पावसकर
दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील विविध भागांत दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तीव्र पाणीटंचाईमुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. या टंचाईला राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका प्रशासन जबाबदार असून, या समस्येवर तातडीने उपाययोजना न केल्यास शिवसेना (ठाकरे) पक्ष मोठे जनआंदोलन उभारेल, असा थेट इशारा स्थानिक आमदार, माजी महापौर सुनील प्रभू यांनी मंगळवारी दिला.
दिंडोशीतील कुरार गाव, नागरी निवारा, संतोष नगर, पिंपरीपाडा, कोकणी पाडा, दत्तवाडी, बाणडोंगरी, तानाजी नगर, क्रांतीनगर, महाराष्ट्र नगर आणि आप्पा पाडा या परिसरांमध्ये अनेक दिवसांपासून पाणी अत्यल्प प्रमाणात व कमी दाबाने येत आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रभू यांच्या नेतृत्वाखाली दिंडोशी विभागातील पदाधिकाऱ्यांनी वरळी येथील महापालिकेच्या इंजिनीअरिंग हब मुख्य कार्यालयात उपायुक्त व जल अभियंता एच. ई. माळवदे यांच्या समवेत विशेष बैठक घेतली.
या बैठकीत नागरिकांच्या तक्रारी मांडण्यात आल्या आणि तातडीने खालील उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. आ. सुनील प्रभू यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, ‘महानगरपालिका ही प्रशासक आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी मिळणे हा मूलभूत हक्क आहे. याची पूर्तता न झाल्यास जनआक्रोश उफाळून येणार असून, शिवसेना ठाकरे पक्ष जनआंदोलन उभारेल. या बैठकीला माजी उपमहापौर अॅड. सुहास वाडकर, माजी स्थापत्य समिती अध्यक्ष तुळशीराम शिंदे, उपविभागप्रमुख प्रदीप निकम, तसेच शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.