महाराष्ट्र

असा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा

कोल्हापूर – भगवा चौक, कसबा बावडा येथे उभारण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा समकालीन १६ छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैलचित्रांचा बारकाईने अभ्यास करून करण्यात आला आहे. हा पुतळा ब्रांझ धातूचा असून त्याचे वजन अंदाजे दोन टन आहे. पुतळ्याची उंची साधारणपणे १२ फूट असून चबुतऱ्यासह ही उंची २१ फूट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन चित्रांमध्ये डोईवर जिगा, कलगीतुरा या शिरोभुषण मंदिल आहे. कमरेला शेला-पटक्यासह कट्यार व पाठीवर ढाल आहे. उजव्या हातामध्ये पट्टा, डाव्या हातामध्ये धोप (तलवार), पायामध्ये सुंदर नक्षीकाम असलेले चढाव आहेत. पुतळ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श व तत्कालीन चेहरा पट्टीचा अभ्यास करून त्या पद्धतीचा चेहरा करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. छत्रपतीच्या हातातील शस्त्रांवरील तसेच पेहरावा वरील कलाकुसर तंतोतंत करण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आलेला आहे. यामध्ये सर्व ऐतिहासिक संदर्भांचा विचार करण्यात आलेला आहे.

रायगडावरील नगारखान्याचा संदर्भ घेऊन भव्य प्रवेशद्वार व त्यावरील सर्व कला तंतोतंत साकारण्याचा प्रयत्न देखील करण्यात आलेला आहे. यामध्ये प्रवेशद्वार व त्यावरील कलाकुसर, दगडी कमानी वरील नक्षीकाम, शरब वगैरेचा प्रयत्न जश्याच्या तसा करण्यात आलेला आहे. दोन्ही बाजूला किल्ल्याच्या तटबंदी सदृश्य दगडी भिंत उभारण्यात आली आहे. मुख्य चबुत-याजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पायाच्या व हाताच्या प्रतिकृतीचा ठसा पूजनासाठी तयार करण्यात आलेला आहे. चबुत-याभोवतीचे नक्षीकाम कोल्हापूर मधील भवानी मंडप, राजवाडा, रंकाळा या सर्वांचा अभ्यास करून उभा करण्यात आलेले आहे.

मुख्य पुतळ्याच्या समोर लहान आयलँडवर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची राजमुद्रा बसवण्यात आलेली आहे. किल्ला सदृश्य भिंतीवर व चबुतऱ्याला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. चौकामध्ये कायम स्वरूपी भगवा ध्वज स्तंभ उभा करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!