पत्रकारांवरील अन्याय दूर करण्यासाठी ” पत्रकार सुरक्षा समिती “

मुंबई / रमेश औताडे : ज्या ज्या ठिकाणी पत्रकारावर अन्याय व हल्ले होतील त्या त्या ठिकाणी ” पत्रकार सुरक्षा समिती ” पत्रकारांच्या पाठीशी खंभीरपणे उभी राहील. असा विश्वास ” कोकण विभागीय पत्रकार अधिवेशन २०२५ ” च्या वेळी उपस्थित पत्रकारांनी व्यक्त केला.
पत्रकारांवरील हल्यांचे वाढते प्रमाण, अवैध धंदेवाल्यांनी पोलिसांच्या मदतीने पत्रकारांवर दाखल केलेले खंडणीचे गुन्हे , यामुळे पत्रकार असुरक्षित झाले आहेत. पत्रकारांचे शासन दरबारी असलेले प्रलंबित प्रश्न या सर्व प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी ” पत्रकार सुरक्षा समिती ” चे कोकण विभागीय पत्रकार अधिवेशन २०२५ नुकतेच पनवेल तालुक्यातील धामणी येथील निसर्गरम्य वातावरणात पार पडले.
यावेळी जेष्ठ पत्रकार रमेश औताडे, एआयएमआयएमचे कोकण विभागीय नेते तथा विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र महासचिव हाजी शहानवाज खान, पत्रकार योगेश महाजन, पत्रकार मयूर तांबडे, पत्रकार संतोष जाधव, सुनील वारगडा, दैनिक भास्करचे प्रतिनिधी भूषण साळुंखे, स्नेहकुंज आधारगृहाचे संस्थापक तथा समाजसेवक नितीन जोशी, समाजसेवक रविंद्र पाटील, पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश उपाध्यक्ष किरण बाथम, रायगड नवीमुंबई अध्यक्ष राज भंडारी, सचिव सनिप कलोते आदिंसह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी रमेश औताडे यांनी बोलताना सांगितले की, पत्रकारांच्या हक्कासाठी निवड केलेलेले हे व्यासपीठ कौतुकास्पद आहे. आज प्रामाणिक पत्रकारांची परवड होताना पाहायला मिळणे ही बाब मुळात पत्रकारिता क्षेत्रावर एक आघात आहे. जुन्या काळातील पत्रकारिता, त्यावेळचा लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभाची ताकद आज काही आमच्याच पत्रकार मित्रांमुळे डागमगली आहे.
तसेच केवळ पत्रकारितेवर आपली उपजीविका करणाऱ्या पत्रकारांचे काय ? असा प्रश्न उपस्थित होतो. कोरोना काळात अनेक पत्रकारांना घरी बसविले गेले, त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे पुढे काय झाले ? त्यांचा परिवार आज कसा जगत असेल ? याबाबत कोणी काही करत नाही. आणि त्याचा कोणाला फारसा फरक देखील पडला नाही, त्याला कारणही आपण पत्रकार आहोत.
मात्र आजची पत्रकारिता म्हणजे माझी गठडी भरून होऊ दे, नंतर बाकीच्यांचं बघू अशी झाली आहे .यामध्ये एखाद्याच्या जीवावर विसंबून राहिलेले पत्रकार मात्र शिकार होतात. आणि अशाच पत्रकारांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेले कोकण विभागीय पत्रकार अधिवेशन २०२५ हे आहे असे औताडे यांनी सांगितले.
यावेळी बोलताना पत्रकार सुरक्षा समितीचे रायगड नवीमुंबई अध्यक्ष राज भंडारी यांनी बोलताना सांगितले की, प्रत्येक क्षेत्रात एकी असते, प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या विरोधात काही आवाज उठवीला तर खात्यातील मंडळी खात्याला सहकार्य करण्यासाठी एकवटतात. मात्र पत्रकारिता क्षेत्र फक्त आपलेपणाचे झाले आहे.