महाराष्ट्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर?
मुंबईसह राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ

मुंबई:- राज्यात सध्या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटने सर्वांची डोकेदुःखी वाढवली आहे. ओमायक्रोनने राज्यात मोठ्या प्रमाणात शिरकाव केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे कोरोना बाधितांची संख्याही दोन हजारांच्या पुढे गेल्याचं दिसून आलं आहे. अशातच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये कोरोना रुग्ण संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.
राज्यात आज दिवसभरात २१७२ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले असून १ हजार ९८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर २२ कोरोना बाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चिंतेची बाब म्हणजे एकट्या मुंबईत १३७७ नवीन रुग्णांची आज नोंद झाली आहे. मुंबईतील ऍक्टिव्ह केसेसची संख्या ५८०३ आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं कोरोना रुग्णांची संख्या एक हजाराच्या खाली आढळून येत होती. मात्र गेल्या तीन दिवसांपासून हि कोरोना रुग्णांची संख्या हजाराच्या पार जाताना दिसत आहे. आरोग्य विभागाने आवाहन करत सर्वांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. नवीन वर्षानिमित्त कोणत्याही समारंभाचे आयोजन होऊ नये आणि कोरोना रुग्ण संख्या वाढू नये यासाठी पोलीस देखील दक्षता घेताना दिसत आहेत.