मुंबई,दि.१७: केरळ, गोवापाठोपाठ सिंधुदुर्ग, रत्नागिरीला जबरदस्त तडाखा दिलेले तौत्के चक्रीवादळ आता मुंबई च्या वेशीवर दाखल झाले असून मुंबईत काल रात्रीपासूनच जोरदार वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे.मुंबईत ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असा इशारा प्रशासनाने दिला आहे, धोक्याचा ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.
मुंबईतील वरळी सी फेस, शिवाजी पार्क, मरीन ड्राईव्ह या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर उंचच उंच लाटा उसळताना पाहायला मिळत आहे. मुंबई आणि उपनगरात गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे. येत्या काही तासांत मुंबईतील पाऊस आणि वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे.
मुंबईत आज ६० ते ७० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चक्रीवादळ मुंबईनजीकच्या समुद्रातून जाणार असल्याने सध्या मुंबईत प्रभाव सर्वत्र पाहायला मिळत आहे.