अॅन्टीजेन तपासणी पॉझिटिव्ह येताच दोन महिलांनी लहान मुलासह ग्रामीण रूग्णालयातून केले पलायन…
रत्नागिरी, दि.२९:अॅन्टीजेन तपासणी अहवाल पॉझिटिव्ह येताच दोन महिलांनी लहान मुलांसह राजापूरच्या ग्रामीण रूग्णालयातून पलायन केल्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी उघडकीला आला. आरोग्य विभागाकडून या तिघांचाही शोध सुरू केला असून त्यांच्या विरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे कळते.
राजापूर तालुक्यातील शेंबवणे येथील एका डॉक्टरकडे घरकाम करणाऱ्या दोन महिलांसह घरातील एका मुलाला ताप व अन्य लक्षणे दिसू लागल्याने या तिघांची राजापूर ग्रामीण रूग्णालयात तपासणी केली.
दरम्यान अॅन्टीजेन तपासणीत या तिघांचेही अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ग्रामीण रूग्णालयाने त्यांच्या उपचारार्थ रायपाटण कोविड केअर सेंटरमध्ये नेण्यासाठी रूग्णवाहिकेची तजवीज केली. मात्र यातील ज्येष्ठ महिलेने कोविड केअर सेंटरमध्ये जाण्यास नकार दिला. थोड्या वेळाने या दोन महिला त्या लहान मुलासह ग्रामीण रूग्णालयातूनच सर्वांचा डोळा चुकवून बाहेर निघून गेल्या. त्यानंतर त्या सायंकाळपर्यंत शेंबवणे येथील आपल्या घरी न पोहोचल्याचे आरोग्य विभागाच्या निदर्शनास आल्याने त्यांचा शोध सुरू आहे