आसाम मधील दोन संशोधकांनी लावला कोविडविरुद्ध आयुर्वेदिक पेयाचा शोध

आसाम- गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोनानं सर्वांचीच डोकेदुखी वाढवली आहे. अशात सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये कोरोनावर प्रभावशाली औषध उपलब्ध न झाल्याने अनेकांना घरामध्ये बसून राहावं लागलं होतं. यातच जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनावर प्रभावशाली ठरू शकेल अशी लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत होते.
अनेक महिन्यांच्या संशोधनानंतर हळूहळू दिलासादायक बाब समोर येऊ लागली. जगभरातील काही देशांनी कोरोनावर प्रभावशाली ठरू शकेल अशी लस तयार केली. अशातच भारताच्या ‘सिरम इन्स्टिट्यूट’ आणि ‘भारत बायोटेक’ या कंपन्यांनी सुद्धा संशोधनाच्या मदतीने कोरोनावर प्रभावशाली ठरू शकेल अशी लस बाजारात आणली.यानंतर आरोग्य यंत्रणांच्या अनेक चाचण्यांनंतर या लसींना केंद्र सरकारची मान्यता मिळाली आणि देशभरात सुरू झालं ‘महा लसीकरण’ अभियान.
मात्र लसीनंतर आता कोविडविरुद्ध आयुर्वेदिक पेयाचा शोध लागला आहे. भारतातील आसामधील दोन संशोधकांनी कोविडविरुद्ध आयुर्वेदिक पेयाचा शोध लावला आहे. भुवनेश्वरच्या प्रयोगशाळेत कोरोना विषाणूविरोधात हे हर्बल पेय ९८ टक्के प्रभावी असल्याचं आढळलं आहे. धेमाजी जिल्ह्यातील पंकज गोगाई आणि गोलाघाट येथील प्रांजल गम यांनी आसाम आणि अरुणाचल प्रदेशात पसरलेल्या भागातील वनस्पतींच्या मिश्रणापासून बनवलेल्या पेयाचं पेटंटसाठी अर्ज दिला आहे. पारंपारिक हर्बल औषध म्हणून याचा वापर केला जाऊ शकतो.