ठाकरे ब्रँड जपण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र या… कार्यकर्त्यां ची मागणी

मुंबई,(प्रतिनिधी) आधी शिवसेना आणि काल राष्ट्रवादी पक्ष फुटल्या च्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब ठाकरे ब्रँड अबाधित राहण्यासाठी उद्धव व राज या ठाकरे बंधूंनी एकत्र यावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे नेत्यांची बैठक राज ठाकरेंनी बोलावली होती. या बैठकीत लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना साथ देऊया असा सूर उमटल्याची माहिती पुढे आली आहे.त्यात आज दादरच्या शिवसेना भवनासमोर महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालाय. आता तरी राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे अशी साद घालणारे पोस्टर झळकलेआहे. लक्ष्मण पाटील नामक कार्यकर्त्याने हे पोस्टर लावले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, शिवसेना फुटली आणि भाजपासोबत गेली. त्यानंतर कुठेतरी ठाकरे ब्रँड कायम राहावा यासाठी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावे अशी कार्यकर्त्यांकडून मागणी होऊ लागली आहे. याआधी २०१७ च्या महापालिका निवडणुकीत आणि त्यानंतरच्या विधानसभेतही मनसे-शिवसेना एकत्र येण्याची चर्चा झाली होती. तेव्हा राज ठाकरेंनी उघडपणे आमच्याकडून कुठलीही अडचण नाही. मात्र त्यावेळी उद्धव ठाकरेंनी साथ दिली नव्हती..मात्र काल राज्यात घडलेल्या घडामोडीनंतर राज ठाकरेंनी मनसे नेत्यांची बैठक बोलावली होती.
या बैठकीत पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. त्यात मराठी माणसांच्या हितासाठी, व बाळासाहेब ठाकरे ब्रॅंड जपण्यासाठी दोन्ही बंधूंनी एकत्र यावे अशी विनंती कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंसमोर मांडली.
राजकारणात काहीही होऊ शकते त्यामुळे आता ठाकरे बंधू एकत्र आले तर, भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी या नवीन समीकरण होऊ पाहत असलेल्या आघाडी समोर मोठे आव्हान उभे राहू शकते…