पुणे शहरात कौशल्य विकास केंद्र उभारणार – मंत्री उदय सामंत

मुंबई प्रतिनिधी : शिक्षण आणि रोजगाराच्या मोठ्या संधी असलेल्या पुणे शहरात विद्यार्थ्यांसह तरुण-तरुणींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील तरुणाईच्या कौशल्य विकासासाठी लवकरच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) अंतर्गत एक भव्य कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येणार असल्याची घोषणा नगर विकास मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत केली.
पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट गावांतील समस्या या विषयावर विधानसभेत सदस्य विजय शिवतारे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या चर्चेत सदस्य भीमराव तापकीर यांनीही सहभाग घेतला.
या चर्चेला उत्तर देताना मंत्री सामंत म्हणाले की, पुणे महापालिकेतील फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही दोन गावे वगळून उर्वरित सर्व गावांचा महापालिकेत समावेश झाला आहे. फुरसुंगी आणि उरुळी देवाची या दोन्ही गावांसाठी स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्यात आली आहे. या नगरपरिषदेला ‘अ’ वर्ग दर्जा देण्यासंदर्भात कोकण विभागीय आयुक्तांचा अहवाल प्राप्त होताच तो दर्जा देण्यात येईल.
महानगरपालिकेकडून सेवांचे हस्तांतरण पूर्ण होईपर्यंत या नगरपरिषद क्षेत्रात पायाभूत सुविधांची कामे सुरु राहतील, असेही मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.
मालमत्ता कराच्या मुद्द्यावर महत्त्वाची घोषणा
नव्याने समाविष्ट गावांमध्ये मालमत्ता कर दुपटीने वाढवून वसूल केला जाणार नाही. ग्रामपंचायत कराच्या दुपटीपेक्षा जास्त कर आकारला जाणार नाही, असे स्पष्ट करत हे दर पुनर्विलोकन होईपर्यंत वसुलीस स्थगिती देण्यात आल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.
फुरसुंगी कचरा डेपो आणि जांभुळवाडी तलावाबाबत निर्णय
फुरसुंगी कचरा डेपोमुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच जांभुळवाडी तलावातून पाणीपुरवठा योजनांसाठी विस्तृत प्रकल्प अहवाल (DPR) तयार केला जाईल आणि तलावाचे सुशोभीकरणही करण्यात येईल, असे सांगण्यात आले.
नवीन समाविष्ट ३२ गावांच्या समस्यांवर लवकर बैठक
पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट ३२ गावांच्या समस्या सोडवण्यासाठी लवकरच उच्चस्तरीय बैठक घेण्यात येईल, असेही मंत्री सामंत यांनी जाहीर केले. फुरसुंगी आणि उरुळी देवाची परिसरात नागरिकांच्या सोयीसाठी पाणीपुरवठा वेळापत्रक बनवण्यात येईल, असेही ते म्हणाले.
या घोषणेमुळे पुण्यातील नव्याने समाविष्ट गावांसह नागरिकांना दिलासा मिळणार असून, कौशल्य विकास केंद्रामुळे तरुणाईसाठी रोजगाराच्या संधी वाढण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.