मुंबईतील शासकीय भूखंडावरील गृहनिर्माण संस्थांसाठी मृणाल कट्ट्यावर मार्गदर्शन संवाद!

मुंबई : संदिप सावंत
नागरी निवारा परिषद वसाहतीसह संपूर्ण मुंबईतील शासकीय भूखंडांवर उभ्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ‘साद प्रतिसाद’ संस्थेच्या वतीने हा कार्यक्रम भोगवटादार वर्ग-२ (‘ब’ वर्ग) भूखंडांचे वर्ग-१ (‘अ’ वर्ग) मध्ये रूपांतरण आणि कायमस्वरूपी मालकी हक्क मिळवण्याच्या प्रक्रियेवर मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित केला आहे. हा संवाद कार्यक्रम गोरेगाव पूर्व येथील मृणाल कट्टा, मृणालताई गोरे स्मृती उद्यान, निवारा विद्यालय जवळ, नागरी निवारा परिषद येथे रविवार दिनांक रोजी सायंकाळी ४:३० वाजता होणार आहे.
या संवादात रूपांतरणाची ३१ डिसेंबरची अंतिम मुदत तसेच, अर्ज सादर करण्याऐवजी आवश्यक कागदपत्रे पूर्ण करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करणे का महत्त्वाचे आहे, यावर तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. याशिवाय, शासनाने अल्प उत्पन्न गटातील (LIG) सदनिकाधारकांसाठी प्रीमियम शुल्क १०% वरून ५% पर्यंत कमी करण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर केला आहे. या प्रस्तावाची सद्यस्थिती आणि त्यानुसार सोसायट्यांनी करावयाची आर्थिक तयारी यावरही चर्चा करण्यात येणार आहे.
’साद प्रतिसाद’ संस्थेने मुंबईतील शासकीय भूखंडांवरील सर्व गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि जागरूक सदस्यांनी या महत्त्वपूर्ण चर्चासत्राला उपस्थित राहावे, जेणेकरून ‘वर्ग १’ चा मालकी हक्क मिळवण्याची प्रक्रिया सामूहिक प्रयत्नांनी जलद आणि त्रुटीविरहित पूर्ण करता येईल, असे आवाहन केले आहे.