मुलांच्या लसीकरणाचा केंद्राचा निर्णय अशास्त्रीय : एम्सच्या वरिष्ठ डॉक्टरांचे मत

नवी दिल्ली :- नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३ जानेवारीपासून १८ वर्षांआतील मुलांना कोरोना विरोधी लस देण्याची घोषणा केली आहे.दरम्यान या घोषणेवर दिल्लीतील एम्स रुग्णालयातील डॉक्टरांनी आक्षेत नोंदवला आहे. ‘देशातील १५ ते १८ वयोगटातील मुलांना करोना प्रतिबंधक लस देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय अशास्त्रीय आहे. यातून कोणताही फायदा होणार नाही,’ असा दावा ‘एम्स’मधील वरिष्ठ साथरोगतज्ज्ञ डॉ. संजय के. राय यांनी केला आहे.
‘एम्स’मध्ये कोव्हॅक्सिन लसीच्या प्रौढ आणि मुलांवर झालेल्या चाचण्यांमध्ये राय हे मुख्य तपासणीस होते. ते राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य संघटनेचे अध्यक्षही आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी मुलांचे लसीकरण सुरू झालेल्या देशांमधील माहितीचे विश्लेषण करायला हवे, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘निःस्वार्थ सेवा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता यामुळे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खूप मोठा चाहता आहे. मात्र, मुलांच्या लसीकरणाविषयी त्यांनी घेतलेल्या अशास्त्रीय निर्णयामुळे मी खूप निराश झालो आहे.
आतापर्यंतच्या आपल्या माहितीनुसार, लसीकरणामुळे संसर्ग होण्यावर कोणताही परिणाम होत नाही. काही देशांमध्ये बूस्टर डोस घेतल्यानंतरही नागरिकांना करोनाचा संसर्ग होत आहे. ब्रिटनमध्ये दररोज ५० हजार रुग्ण सापडत आहेत. यातून, संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणाचा काही फायदा नाही, हेच स्पष्ट होत आहे. मात्र, गंभीर आजार न होणे किंवा मृत्यू रोखणे यासाठी या लसी परिणामकारक आहेत.
लसीकरणामुळे ८० ते ९० टक्के मृत्यू रोखले असतील, तर दर दहा लाख लोकसंख्येमागे १३ ते १४ हजार मृत्यू रोखण्यामध्ये आपल्याला यश आले आहे.मात्र, मुलांमधील संसर्गाचा अभ्यास केला, तर संसर्गातून गंभीर आजार होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. तसेच, संसर्गानंतर मृत्यूचे प्रमाण दहा लाख बालकांमागे दोन एवढे कमी आहे.त्यामुळे लसीकरणातून होणारे विपरीत परिणामही विचारात घ्यावे लागतील. आतापर्यंतच्या उपलब्ध माहितीमध्ये फायद्याच्या तुलनेमध्ये धोकाच जास्त असल्याचे दिसून येते.अमेरिकेसारख्या काही देशांमध्ये काही महिन्यांपासून मुलांवरील लसीकरण सुरू आहे. तेथील माहितीचे विश्लेषण केल्यानंतरच, मुलांच्या लसीकरणाचा कार्यक्रम आखला पाहिजे.’असा सल्ला एम्सच्या डॉक्टरांनी दिला आहे.