महाराष्ट्र

‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्ष पूर्ण; मंत्रालयात निनादणार समूहगान…

मुंबई: देशप्रेमाचे प्रतीक असलेल्या ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात शुक्रवार, ७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता ‘वंदे मातरम्’ चे समूहगान होणार आहे. ‘सार्ध शताब्दी’ महोत्सवाच्या माध्यमातून पुढील वर्षभर राज्यभरात कौशल्य विकास विभागाच्यावतीने विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

थोर कवी आणि तत्वज्ञ बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी १८७५ साली रचलेल्या ‘वंदे मातरम’ या गीताला ७ नोव्हेंबर रोजी १५० वर्ष पूर्ण होत असल्याने मंत्री लोढा यांच्या संकल्पनेतून कौशल्य विकास विभागाच्या वतीने विविध कार्यक्रम होणार आहेत. तसेच, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनेही राज्यभरात सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

यासंदर्भात मंत्री लोढा म्हणाले की, ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या वंदे मातरम गीतामध्ये  देशप्रेम निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे. स्वातंत्र्य लढ्यातील शहिदांना अभिवादन आणि मातृभूमीला वंदन करणारे संस्कार या गीताच्या समूह गायनातून होणार असल्याने शासकीय स्तरावरून शैक्षणिक संस्था आणि शासकीय आस्थापनांमध्ये ‘वंदे मातरम्’ गीताचे समूहगान आयोजित करण्याबाबत परिपत्रक आणि अध्यादेश जारी करण्यात आले आहेत.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही यासंदर्भात देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात कौशल्य विभागानेही राज्यस्तरीय तसेच तालुका स्तरावर समित्या स्थापन केल्या आहेत. राज्यभरात निबंध लेखन, परिसंवाद, प्रदर्शने आणि वक्तृत्व स्पर्धा असे कार्यक्रम होणार आहेत.

विविध सामाजिक संघटना, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तसेच समाज माध्यमांवर या ऐतिहासिक सोहळ्याला व्यापक रूप देण्याचा कौशल्य आणि सांस्कृतिक विभागाचा प्रयत्न आहे. देशभक्ती जागृत करणाऱ्या सार्ध शताब्दी महोत्सवात सर्वानी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा,असे आवाहन मंत्री लोढा यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!