ज्येष्ठ अभिनेते रमेश देव काळाच्या पडद्याआड, वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई:- मराठी सिनेसृष्टीचा सुवर्णकाळ गाजवणारे जेष्ठ अभिनेते रमेश देव यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. अभिनेते रमेश देव यांच्या जाण्याने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
त्यांनी एकाहून एक गाजलेले सिनेमे चित्रपटसृष्टीला दिले आहेत. मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये त्यांनी नायक आणि खलनायक अशा दोन्ही भूमिका साकारल्या आहेत. १९५१ साली त्यांनी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केलं. तेव्हापासून आत्तापर्यंत त्यांनी सरस सिनेमे चित्रपटसृष्टीला दिले आहेत.
पाटलाची पोर या सिनेमात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांवर आपली छाप टाकली.मात्र, यानंतर ‘आंधळा मागतो एक डोळा’ हा सिनेमा रमेश देव यांच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला. या सिनेमामुळेच खऱ्या अर्थाने त्यांच्या कारकीर्दीला सुरुवात झाली. यानंतर रमेश देव यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. तब्बल १८० हून अधिक मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये भूमिका साकारत ते प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनले.
२०१३ साली रमेश देव यांना पुणे येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जीवन गौरवाने सन्मानित देखील करण्यात आलं आहे. दरम्यान त्यांची ही एक्झिट काळजाला चटका लावून जाणारी आहे.
रमेश देव यांच्या जीवनाचा सविस्तर आढावा:-
रमेश देव हे १९५१ मध्ये बालकलाकार म्हणून पाटलाची पोर चित्रपटात दिसले. त्यांनी ‘सीमा देव’ या नामांकित अभिनेत्रीशी लग्न केले. या दोघांना अजिंक्य आणि अभिनय हे दोन मुलगे आहेत.
अभिनय हा चित्रपट दिग्दर्शक आहे, त्याने २०११ मध्ये ‘दिल्ली बेली’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अजिंक्य हा एक प्रसिद्ध मराठी अभिनेता आहे.सीमा आणि रमेशने पती, पत्नी आणि प्रेमी म्हणून अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. देव यांनी “’आंधळा मागतो एक डोळा” (१९५६) चित्रपटात पदार्पण केले.
त्यांचा बॉलिवूडचा पहिला चित्रपट होता “आरती”. रमेश देव यांनी दिग्दर्शन तसेच अनेक टीव्ही मालिका आणि नाटकांची निर्मिती केली आहे. त्यांनी ‘पैशाचा पाऊस’ आणि ‘भाग्य लक्ष्मी’ या चित्रपटांत काम केले.
“दस लाख” (१९६६) चित्रपटात मनोहरची भूमिका तर ‘खिलोना’ आणि ‘जीवन मृत्यु’ या चित्रपटांत काम करण्याची संधी मिळाली.
रमेश देव यांनी कौल साहबच्या रूपात २०१३ मध्ये “जॉली एलएलबी” चित्रपटात काम केले होते. 2016 मध्ये त्यांनी ‘घायल वन्स अगेन’ चित्रपटात काम केले होते.रमेश देव यांना लाइफ टाईम अवॉर्डिअर पुरस्काराने गौरविण्यात आले.