..तर लॉकडाऊन निश्चित,गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे संकेत

मुंबई-राज्यात सध्या ओमायक्रोनने मोठ्या प्रमाणात शिरकाव केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे कोरोना बाधितांची संख्या दोन हजारांच्या पुढे गेल्याचं दिसून आलं आहे. राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने राज्य सरकारने राज्यात काही निर्बंध लावले आहेत. मात्र, अद्यापही सर्वसामान्यांकडून नियमांचं पालन होत नसल्याचं चित्र राज्यात पाहायला मिळत आहे.अश्यातच वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी अनेक राज्यांनी कठोर निर्बंध लावले असून महाराष्ट्रातही ती वेळ येण्याची शक्यता आहे. लावण्यात आलेले निर्बंध अजून कठोर केले जातील, असा इशाराही देण्यात आला आहे.
बुधवारी दिवसभरात राज्यात ३,९०० रुग्ण आढळले. त्यात सर्वाधिक २५१० रुग्ण मुंबईत आढळले आहेत़ मुंबईसह ठाणे परिसरात एका दिवसात दुप्पट रुग्णवाढ नोंदविण्यात आली आह़े. दरम्यान राज्याचे गृहमंत्री यांनी वेळ पडली तर राज्यात लॉकडाऊन लागू शकतो असा इशारा प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला आहे.
‘तज्ज्ञांच्या अंदाजानुसार कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती असून तसं दिसतही आहे. त्यामुळे सरकारने जरी नवीन वर्षाचं उत्साहात स्वागत करायचं असेल तरी काळजी घेण्याची गरज असल्याचं सांगितलं आहे. प्रत्येकाने आपला आनंद, उत्साह घरात राहूनच साजरा करावा. सार्वजनिक ठिकाणी येणं टाळावं आणि करोनाच्या वाढीला हातभार लावू नये. प्रत्येकाने आपली आणि कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे,” असं आवाहन दिलीप वळसे पाटील यांनी केलं.
तसंच ‘सरकारने जे काही निर्बंध घालून दिले आहेत त्यांचं पालन झालं नाही आणि उद्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर लॉकडाऊनपर्यंत जावं लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. सरकारच्या मनात लॉकडाऊन लावण्याचा विचार नाही, पण परिस्थितीप्रमाणे निर्णय घ्यावा लागेल’असंही मत दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केलं.





