तौक्ते चक्रीवादळामुळे बाधित सिंधुदुर्ग किल्ल्यावरील रहिवासी अद्यापही अंधारात..
सिंधुदुर्ग,दि.३०: काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या किनारपट्टीला झोडपणाऱ्या तौक्ते चक्रीवादळाने इतिहासाच्या पाऊलखुणा असणाऱ्या छत्रपति शिवरायांच्या सिंधुदुर्ग किल्ल्याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान केले..महाराजांच्या पराक्रमी गाथांमधील महत्त्वाचा साक्षीदार असणाऱ्या सिंधुदुर्ग किल्ल्याकडे मात्र वादळानंतर अनेक दिवस उलटले असतानाही प्रशासनाचे लक्ष गेलेले नाही.
तौक्ते चक्रीवादळामुळे छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या या नावाजलेल्या मालवणच्या समुद्रातील सिंधुदुर्ग किल्यावरील घरांची, वीज खांबांची झालेली पडझड, मोडून पडलेली झाडे आणि गेले अनेक दिवस विजेअभावी जीवन जगणाऱ्या सिंधुदुर्ग किल्लेवासी यांचे सध्या हाल सुरु आहेत.अनेक दिवस उलटूनही अद्यापही प्रशासन इथे पोहोचलेले नाही.
तौक्ते चक्रीवादळात सिंधुदुर्ग किल्ल्यावर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराचंही नुकसान झालं आहे. महाराजांचे पुत्र राजाराम महाराजांनी हे मंदिर बांधले असून, या मंदिराच्या मागील बाजूस झाड पडल्याने मंदिराच्या छताचे नुकसान झाले आहे. तर किल्ले सिंधुदुर्ग वरील श्री देवी भवानी मंदिर आणि महापुरुष मंदिराच्या छपराची कौलेही उडून गेली आहेत. किल्ला आणि समुद्रातील वीज खाबांची पडझड झाल्यामुळे किल्यावर अंधाराचं साम्राज्य आहे. त्यामुळं आता हा संपूर्ण किल्ला आणि किल्ल्यावर राहणारे रहिवासी मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.